For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

दहशतवादावरून अफगाण-पाक युद्ध

06:34 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
दहशतवादावरून अफगाण पाक युद्ध

दहशतवादाचा मसिहा म्हणून परिचीत असलेला पाकिस्तान आता अफगाणिस्तानच्या विरोधात उभा ठाकलेला आहे. पाकिस्तानी सैन्य तळावर हल्ला करून सात सैनिकांना ठार केल्याप्रकरणी पाकिस्तानी हवाई दलाने पाक अफगाण सीमेवर सर्जिकल स्ट्राईक घडवून आणला. तर दोन महिन्यांपूर्वी इराणच्या इस्लामिक रेव्हलुशनरी गार्डच्या सैनिकांनी पाकिस्तानी हद्दीत घुसून हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर तिन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झालेला असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

Advertisement

चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद्यांच्या व्याख्या उलगडवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होत आहे. पाकिस्तान ज्या दहशतवाद्यांचा मसिहा बनून वावरत असतानाच त्यांच्याकडून चोहो बाजूने आक्रमणे पेलावी लागत आहेत. पाकिस्तानने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला अफगाणिस्तान उत्तर देणार असल्याचे तालिबान सरकारने नमूद केले असले तरी पुढे विशेष काही झालेले नाही. तैरिके तालिबान  पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात उत्तर वझिरीस्तान प्रांतात पाकिस्तानच्या सात सैनिकांना ठार केल्याप्रकरणी पाक हवाई दलाने अफगाण सीमेवर खोस्त प्रांतात ही कारवाई केली. या कारवाईत सात नागरिकांचा बळी गेल्याचे अफगाणिस्तान प्रशासनाने म्हटले असून पाकिस्तानने त्याचे खंडण करत हवाई दलाने केवळ दहशतवाद्यांनाच कंठस्नान घातलेले असून हे हल्ले पाकिस्तानी भागातच केल्याचा दावा केला. पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानने हवाई हल्ले केले.

अफगाणिस्तानबरोबर झालेल्या खडाजंगीनंतर दोन दिवसांपूर्वी चीन सरकारने विकसित केलेल्या गदर बंदरावर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने हल्ला करून दोन पाकिस्तानी रेंजर्सना ठार केले. प्रत्यूत्तरा दाखल पाकिस्तानी सैन्याने सात दहशतवाद्यांना ठार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानला नामोहरम केलेले आहे. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी पुढे रेटली जात असून बलुच प्रांतात पाकिस्तान सरकारकडून स्थानिकांना डावलले जात असल्याचे स्पष्ट करून तिथे पंजाब प्रांतातील नागरिकांना वसविले जात असल्याचा या अतिरेक्यांचा आरोप आहे. चीन सरकारच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या विकास प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत.  तसेच परप्रांतियांना बलुचिस्तानमध्ये वसाहती वाढविण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात सरकारचा वाटा असल्याचा त्यांचा दावा आहे.

Advertisement

याच बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर हल्ला करण्यासाठी इराणी सैन्याने दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानात घुसून सिस्तान प्रांतात उपद्रव माजवणाऱ्या जैश अल् अदलच्या अतिरेक्यांना हुसकून लावण्यासाठी ही कारवाई केली होती. इराणमधील सिस्तान प्रांतात असलेल्या सुन्नी बहुल नागरिकांनी इराणबरोबर दोन हात केलेले आहेत. या प्रांतात वावरणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी सैन्याचा सक्रीय पाठिंबा लाभत असतो. जैश अल् अदलचे दहशतवादी शिया बहूल इराणमधील विविध ठिकाणांवर हल्ले करत असतात. तसेच जैश अल् अदल या संघटनेचा आयएसआयएस या संघटनेशी संबंध असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. याच कारणावरून इराण आणि पाकिस्तान यांच्यात हमरीतुमरी सुरु असून पाकिस्तानला आपण अणुबॉम्ब संपन्न असल्याचा गर्व आहे.

Advertisement

पाकिस्तान व अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराण तसेच अफगाणिस्तान आणि इराण यांच्यात तणाव निर्माण झालेला आहे. एकेकाळी संपूर्ण मुस्लिम जगताला एकत्र आणण्याचा विचार करत असलेल्या पाकिस्तानवर एकामागोमाग एक असे हल्ले होत आहे. इराण हे शिया मुस्लिम बहुल राष्ट्र असून ते संपविण्यासाठी सुन्नी राष्ट्रे एकत्रित काम करताना दिसतात. यात सौदी अरेबिया, कुवेत व त्यांना साथ देणारा पाकिस्तान असून त्याचाच वचपा इराणला काढायचा आहे. पाकिस्तान सरकारने इराण, चीन आणि अफगाणिस्तानच्या सहकार्याने भारताला संपविण्याचा विचार चालविला होता. पण आज पाकिस्तानला संपविण्यासाठी त्याचे मुस्लिम शेजारी देश अर्थात अफगाणिस्तान आणि इराण टपलेले आहेत. भारत विरोधात उगारलेले आणि पाकिस्तानी सैन्याचा घटक असलेल्या आयएसआय या गुप्तचर संघटनेने दहशतवादाला खतपाणी घालण्याचे अवलंबलेले तंत्र त्यांच्यावरच उलटलेले आहे.

एकेकाळी इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानला भेट दिली असता पाकिस्तानी अणुबॉम्बला इस्लामिक बॉम्ब असल्याची घोषणा त्यावेळी केली होती. आता या तिन्ही मुस्लिम देशांत प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे. इराण आणि अफगाणिस्तान यांच्यात आता पाणी वाटपावरुन तणाव उद्भवलेला आहे. आपल्या या दोन्ही शेजारी मुस्लिम देशांना सोबत घेऊन भारताला नामोहरम करण्याचे स्वप्न   पाकिस्तानने आपल्या उराशी बाळगले होते. पण हेच दोन्ही बांधव देश पाकिस्तानला नामोहरम करत आहेत.

- प्रशांत कामत

Advertisement
Tags :
×

.