अफगाणिस्तान-पाकिस्तानची शस्त्रसंधी
एक आठवड्याच्या संघर्षानंतर 48 तासांचा विराम
वृत्तसंस्था / काबूल, इस्लामाबाद
एक आठवडाभर चाललेल्या घनघोर संघर्षानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 48 तासांची मर्यादित शस्त्रसंधी मान्य केली आहे. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून त्यापुढचे 48 तास हे दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करणार नाहीत, असे त्यांनी ठरविले आहे. ही शस्त्रसंधी दोन्ही देशांनी एकमेकांच्या सहमतीने केली आहे, असे पाकिस्तानने घोषित केले आहे.
या अस्थायी शस्त्रसंधीमुळे दोन्ही देशांमधील धुमश्चक्रीला काही काळापुरता विराम मिळाला आहे. गेल्या एका आठवड्यात दोन्ही देशांनी एकमेकांवर जोरदार हल्ले केले आहेत. अफगाणिस्ताने पाकिस्तानवर भूमीवरुन, तर पाकिस्तानने अफगाणिस्तानवर आकाशातून हल्ले केले. पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानच्या काबूल आणि कंधार येथील तालिबान तळांवर विमानांमधून हल्ले केले. अफगाणिस्तानकडे स्वत:ची युद्धविमाने नाहीत. तसेच वायुहल्लाविरोधी यंत्रणाही नाही. त्यामुळे पाकिस्तान त्या देशावर सहजपणे असे हल्ले करु शकत आहे.
पाकिस्तानने चौक्या गमावल्या
वायुयुद्धात पाकिस्तानचे निर्विवाद वर्चस्व असले, तरी भूमीवरील संघर्षात अफगाणिस्तान वरचढ ठरताना दिसून आला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा या प्रांतात अफगाण सैनिकांनी मुसंडी मारली असून सीमावर्ती भागातील पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौक्या तालिबानने एकतर ताब्यात घेतल्या आहेत, किंवा नष्ट केलेल्या आहेत. अफगाण सैनिकांच्या हल्ल्यात पाकिस्तानचे 23 सैनिक बुधवारी मृत्यूमुखी पडले, अशी माहिती तालिबान प्रवक्त्याने दिली आहे. या माहितीचा स्पष्ट इन्कार पाकिस्तानने केलेला नसल्याने त्याची मोठी हानी झाली असावी, असे मानण्यात येत आहे. शस्त्रसंधी झाल्याने शांतता निर्माण झाली आहे.
अफगाणिस्तानचा दावा
ही शस्त्रसंधी दोन्ही देशांनी एकमेकांच्या सहमतीने केली आहे, असा पाकिस्तानचा दावा असला, तरी अफगाणिस्तानने तो मानण्यास नकार दिला आहे. शस्त्रसंधीची विनंती प्रथम पाकिस्तानने केलाr आहे. त्यानंतर आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन शस्त्रसंधी केली आहे. त्यामुळे आगामी 48 तास सीमेवर शस्त्रे चालणार नाहीत, असे तालिबानच्या प्रवक्त्यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले आहे.
48 तासांच्या नंतर काय...
शस्त्रसंधी तर झाली, पण ती स्थायी नसल्याने आणखी 48 तासांनी काय होणार, यासंबंधी मोठी उत्सुकता आहे. आम्ही शस्त्रसंधीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करु. परंतु, शत्रूपक्षाने तिचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही. कोणत्याही आगळीकीला तसेच प्रत्युत्तर दिले जाईल, असे तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. त्यामुळे या शस्त्रंधीवर संशय निर्माण झाला आहे.
बुधवारी 15 जण ठार
दोन्ही देशांमध्ये बुधवारी झालेल्या सशस्त्र संघर्षात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यापैकी 5 जण पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात मृत्यू पावलेले आहेत, तर तालीबान सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे 10 सैनिक ठार झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. शस्त्रसंधी झाल्यानंतरही काही काळ दोन्ही देशांमध्ये संघर्ष होत राsिहला होता. तथापि, नंतर शांतता प्रस्थापित झाली आहे.