अफगाण क्लीन स्वीपपासून वंचित
शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेचा 7 गड्यांनी विजय, रहमानउल्लाह गुरबाज सामनावीर, मालिकावीरचा मानकरी
वृत्तसंस्था / शारजा
तीन सामन्यांच्या वनडे क्रिकेट मालिकेत येथे खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेने अफगाणचा 7 गड्यांनी पराभव केला. द. आफ्रिकेच्या या विजयामुळे अफगाणची ही मालिका एकतर्फी जिंकण्याची संधी हुकली. अफगाणने ही वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. अफगाणच्या रहमानउल्लाह गुरबाजला ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ असा दुहेरी पुरस्कार मिळाला.
या मालिकेतील शेवटच्या सामन्यात अफगाणने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. द. आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगाणचा डाव 34 षटकात 169 धावांत आटोपला. त्यानंतर द. आफ्रिकेने 33 षटकात 3 बाद 170 धावा जमवित हा सामना 17 षटके बाकी ठेवून 7 गड्यांनी जिंकला.
अफगाणच्या डावामध्ये सलामीच्या गुरबाजने 94 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांसह 89 तर कर्णधार शाहीदीने 17 चेंडूत 1 चौकारांसह 10 आणि गझनफरने 15 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 31 धावा जमविल्या. अफगाणच्या केवळ तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. द. आफ्रिकेतर्फे एन्गिडी, पीटर आणि फेहलुक्वायो यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. फॉर्च्युनने 44 धावांत 1 बळी मिळविला. अफगाणचे 3 फलंदाज धावचित झाले. अफगाणने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 38 धावा जमविताना 2 गडी गमविले. गुरबाजने 47 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. अफगाणच्या डावात 7 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेच्या डावामध्ये सलामीच्या झोर्जीने 31 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 26 धावा जमविताना कर्णधार बवुमासमवेत सलामीच्या गड्यासाठी 40 धावांची भागिदारी केली. बवुमाने 28 चेंडूत 3 चौकारांसह 22 धावा केल्या. हेंड्रीक्सने 31 चेंडूत 1 चौकारासह 18 धावा जमविल्या. द. आफ्रिकेची एकवेळ स्थिती 3 बाद 80 अशी होती. त्यानंतर मार्करम आणि स्टब्ज यांनी चौथ्या गड्यासाठी 110 धावांची अभेद्य शतकी भागिदारी करुन विजयाचे सोपस्कार 33 व्या षटकात पूर्ण केले. मार्करमने 67 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 69 तर स्टब्जने 43 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 26 धावा जमविल्या. द. आफ्रिकेच्या डावात 5 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 46 धावा जमविताना 1 गडी गमविला. त्यानंतर दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 124 धावा जमविताना आणखी 2 गडी गमविले. मार्करमने 54 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह अर्धशतक झळकविले. अफगाणतर्फे गझनफर, नबी आणि अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. गुरबाजने या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शानदार शतक झळकविले होते. या शेवटच्या सामन्यात त्याने 89 धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक : अफगाण 34 षटकात सर्वबाद 169 (गुरबाज 89, शाहीदी 10, गझनफर नाबाद 31, अवांतर 13, एन्गिडी, पीटर, फेहलुकेवायो प्रत्येकी 2 बळी, फॉर्च्युन 1-44), द. आफ्रिका 33 षटकात 3 बाद 170 (झोर्जी 26, बहुमा 22, हेंड्रीक्स 18, मार्करम नाबाद 69, स्टब्ज नाबाद 26, अवांतर 9, गझनफर, नबी, फरीद अहमद प्रत्येकी 1 बळी)