अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर हल्ला
सीमेवरील चौक्या लक्ष्य, प्रतिशोधाची कारवाई
वृत्तसंस्था / काबूल
पाकिस्तानने अफगाणीस्तावर केलेल्या विमान हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्या देशाने पाकिस्तानच्या सीमेवरील अनेक चौक्यांवर प्रतिहल्ला केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या अनेक चौक्या नष्ट झाल्याचे वृत्त आहे. काही सैनिकही ठार झाल्याची शक्यता आहे. मात्र जीवीतहानीच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.
अफगाणिस्तानच्या संरक्षण विभागाने या हल्ल्याची माहिती शनिवारी दिली. सीमेपलिकडील अनेक चौक्यांवर अफगाणिस्तानच्या सैनिकांनी मोठे आक्रमण केले आहे. पाकिस्तानची मोठी हानी झाली आहे, असा दावा संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने केला. पाकिस्तानचा सूड घेण्यासाठी अफगाणिस्तानचे 15 हजार सैनिक सज्ज आहेत. आम्ही रणगाडेही तयार ठेवले आहेत, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले.
परिस्थिती चिघळणार
पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी केलेला विमानहल्ला आणि त्यानंतर अफगाणिस्ताची बदला घेण्याची कारवाई यामुळे पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानातील 46 जण ठार झाले होते. त्यांच्यापैकी बहुतेकजण स्थलांतरित होते. त्यांनी पाकिस्तानमधूनच स्थलांतर केले होते, अशी माहिती अफगाणिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली होती.
वाद काय आहे ?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावाद बऱ्याच दशकापासून आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमारेषा अफगाणिस्तानला मान्य नाही. पाकिस्तानातील पठाण बहुल भूभाग, जो दोन्ही देशांच्या सीमेला लागून आहे, त्यावर अफगाणिस्तानने आपला अधिकार असल्याचे प्रतिपादन केले आहे. दोन्ही देशांमधील सीमारेषा काल्पनिक असून या सीमारेषेमुळे अफगाणिस्तानवर अन्याय झाला आहे, असे तालिबानचे म्हणणे आहे.
नागरीक ठार झाल्याचा आरोप
पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानचे काही नागरीकही ठार झाल्याचा आरोप त्या देशाने केला आहे. पाकिस्तानला त्याच्या या दु:साहसाची किंमत भोगावी लागणार आहे. आम्ही त्या देशाला सोडणार नाही. अफगाणिस्तान आपली भूमी पाकिस्तानकडून परत मिळविल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य तालिबान नेत्यांनी शुक्रवारी केले होते. त्यानंतर त्वरित पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानचा हल्ला भेकड होता, अशीही टीका करण्यात आली.
पाकिस्तानचा 1 सैनिक ठार
गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानच्या सैनिकांशी पाकिस्तातच्या सैनिकांची चकमक झाली होती. त्या चकमकीत पाकिस्तानच्या अर्धसैनिक दलाचा एक सैनिक ठार झाला होता, तर काही सैनिक जखमी झाले होते. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारची स्थापना झाल्यानंतर पाकिस्तानशी होत असलेल्या संघर्षात वाढ होत आहे. पाकिस्तानने अतिरिक्त सैनिक तुकड्या सीमेवर नियुक्त केल्या आहेत. अफगाणिस्ताननेही आपले सैनिक सीमेवर आणले आहेत. या देशातील टोळ्याही पाकिस्तानशी संघर्ष करण्यास सज्ज आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
मध्यपूर्वेतील संघर्षाचीही पार्श्वभूमी
अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्षाला मध्यपूर्वेत सध्या होत असलेल्या संघर्षाचीही पार्श्वभूमी असल्याचे तज्ञांचे मत आहे. नुकतेच सिरीयामध्ये बंड होऊन सत्तांतर झाले आहे. त्यानंतर तेथे नवे तणाव निर्माण झाले आहेत. सिरीयातील काही गटांचे अफगाणिस्तानातील तालिबानशी संबंध असल्याची चर्चा आहे. हे गट आता सिरीयात सत्तेवर आल्याने अफगाणिस्ताची बाजू वरचढ झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानला आपल्या पश्चिम सीमेवरही अधिक सैनिक आणावे लागले आहेत.