अफगाण अ अंतिम फेरीत दाखल
वृत्तसंस्था / अल अमिरात
येथे सुरू असलेल्या 2024 च्या एसीसी इमर्जिंग आशिया चषक टी-20 स्पर्धेत झालेल्या सामन्यात अफगाण अ संघाने इंडिया अ संघाचा 20 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता अफगाण अ व श्रीलंका अ यांच्यात अंतिम सामना रविवारी खेळविला जाईल.
अल अमिरात क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाण अ संघाने 20 षटकात 4 बाद 206 धावा जमवित इंडिया अ संघाला विजयासाठी 207 धावांचे आव्हान दिले. पण इंडिया अ संघाने 20 षटकात 7 बाद 186 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. यग पराभवामुळे इंडिया अ चे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.
अफगाण अ ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला. सेदीक्विला अटलने 52 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांसह 83 धावा झोडपल्या. झुबेर अकबारीने उपयुक्त अर्धशतक झळकविताना 41 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह 64 धावा जमविल्या. इंडिया अ संघातर्फे रसिक सलामने 25 धावांत 3 गडी तर अकिब खानने 48 धावांत 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडिया अ च्या डावामध्ये रमनदीप सिंगने 2 षटकार आणि 8 चौकारांसह 34 चेंडूत 64 धावा झळकविल्या. आयुष बडोनीने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 24 चेंडूत 31 तर निशांत सिंद्धूने 13 चेंडूत 3 चौकारांसह 23 आणि नेहल वधेराने 14 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. अफगाण अ तर्फे अल्ला गझनफर आणि अब्दुल रेहमान यांनी प्रत्येकी 2 तर अश्रफने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: अफगाण अ 20 षटकात 4 बाद 206 (एस. अटल 83, झुबेद अकबारी 64, रसिक सलाम 3-25), इंडिया अ 20 षटकात 7 बाद 186 (रमनदीप सिंग 64, बडोनी, 31, निशांत सिंद्धू 23, वधेरा 20, गझनफर 2-14, अब्दुल रेहमान 2-32, अश्रफ 1-13)