For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अफगाणिस्तानचे विमान उतरले चुकीच्या धावपट्टीवर

06:50 AM Nov 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
अफगाणिस्तानचे विमान उतरले चुकीच्या धावपट्टीवर
Advertisement

दिल्ली विमानतळावरील प्रकार : सुदैवाने दुर्घटना टळली

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला. अफगाणिस्तानमधून दिल्लीत दाखल झालेले एक विमान चुकीच्या धावपट्टीवर उतरल्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला. सुदैवाने याप्रसंगी दुसरे कोणतेही विमान लँडिंगच्या मार्गात न आल्याने संबंधित यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. ही घटना रविवारी दुपारी 12:06 वाजता घडली असली तरी सोमवारी यासंबंधी माहिती उजेडात आली. अफगाण एरियाना एअरलाईन्सचे ‘एफजी 311’ हे विमान काबूलहून येत असताना हा प्रकार घडला. आता याबाबत विमानतळ प्राधिकरणाकडून सखोल चौकशी सुरू आहे. संबंधित पायलटवर दंडात्मक किंवा अन्य कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

विमानाला धावपट्टी 29 वर डावीकडे उतरण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु पायलट चुकून धावपट्टी 29 वर उजवीकडे उतरल्याचे निदर्शनास आले आहे. विमानाचे लँडिंग झालेली धावपट्टी सहसा टेकऑफसाठी वापरली जाते. वृत्तांनुसार, टेकऑफच्या वेळी सदर धावपट्टीवर कोणतेही विमान नव्हते, अन्यथा गंभीर अपघात होण्याचा धोका होता. विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू करत या गंभीर त्रुटीबाबत अफगाण विमान वाहतूक अधिकाऱ्यांना अहवाल पाठवला जाईल असे म्हटले आहे.

दिल्ली विमानतळ अधिकाऱ्यांनी चुकीच्या धावपट्टीवर विमान उतरवण्याचे वर्णन ‘चमत्कारिक सुटका’ असे केले आहे. अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते, परंतु योगायोगाने किंवा नशिबाची साथ लाभल्याने रविवारी बरेच प्रवासी बचावले असेही स्पष्ट करण्यात आले.

Advertisement
Tags :

.