अफगाणिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांचा यू-टर्न
तीव्र टीकेनंतर पत्रकार परिषदेसाठी महिला पत्रकारांना केले आमंत्रित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी रविवारी नवी दिल्लीत आणखी एक पत्रकार परिषद बोलावत महिला पत्रकारांनाही आमंत्रित केले. या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. याप्रसंगी यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत वेळ कमी असल्यामुळे सर्वांना आमंत्रित करण्यात आले नसल्याची सारवासारव करत अफगाणिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनी करत ‘यू-टर्न’ घेतल्याचे दिसून आले.
मुत्ताकी यांनी शनिवारी आपल्या मीडिया संवादातून महिला पत्रकारांना वगळल्याबद्दल त्यांच्यावर तीव्र टीका झाली होती. भारताच्या आठवडाभराच्या दौऱ्यावर असलेल्या मुत्ताकी यांना मागील पत्रकार परिषदेत कोणत्याही महिला पत्रकारांना उपस्थित राहण्यापासून रोखल्याने टीकेचा सामना करावा लागला होता. अनेक पत्रकार, विरोधी पक्षनेते आणि महिला हक्क समर्थकांनी अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा निषेध केला होता.
एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि इंडियन वुमन्स प्रेस कॉर्प्स यांनी महिला पत्रकारांना वगळणे ‘अत्यंत भेदभावपूर्ण’ म्हटले होते. तसेच राजनैतिक विशेषाधिकार किंवा व्हिएन्ना कन्व्हेन्शन अंतर्गत कोणतेही समर्थन नाकारले होते. वाढत्या टीकेदरम्यान अफगाण परराष्ट्रमंत्र्यांच्या टीमने रविवारच्या पत्रकार परिषदेसाठी नवीन आमंत्रणे जारी करत हा कार्यक्रम सर्व माध्यम कर्मचाऱ्यांसाठी खुला असल्याचे घोषित केले.
तालिबानचे ज्येष्ठ नेते मुत्ताकी 2021 मध्ये अफगाणिस्तानात पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांच्या पहिल्या अधिकृत भेटीसाठी गुरुवारी नवी दिल्लीत पोहोचले होते. महिलांचे हक्क, शिक्षण आणि सार्वजनिक सहभाग प्रतिबंधित करणाऱ्या धोरणांवर सतत टीका होत असतानाही प्रादेशिक देशांशी पुन्हा संपर्क साधण्याच्या तालिबान सरकारच्या प्रयत्नांदरम्यान त्यांचा दौरा सुरू आहे.