For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उच्च न्यायालयात आज मनपाकडून प्रतिज्ञापत्र?

12:07 PM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
उच्च न्यायालयात आज मनपाकडून प्रतिज्ञापत्र
Advertisement

प्रांताधिकाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा नाहीच

Advertisement

बेळगाव : शहापूर येथील ‘त्या’ जागेप्रकरणी महानगरपालिकेमध्ये 20 कोटी रुपये देण्याबाबत ठराव झाला. मात्र या ठरावाची अद्याप प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे गुरुवार दि. 29 रोजी महानगरपालिकेच्यावतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे महापालिका नेमके काय म्हणून प्रतिज्ञापत्र दाखल करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत कायदा सल्लागारांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

महानगरपालिकेच्यावतीने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहापूर खडेबाजार येथील बँक ऑफ इंडिया कॉर्नरपासून जुन्या धारवाड रस्त्यापर्यंत हा रोड करण्यात आला होता. रोड करताना जागामालकांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे जागामालक बाळासाहेब पाटील यांनी न्यायालयात नुकसानभरपाईसाठी याचिका दाखल केली. न्यायालयाने संबंधित जागामालकाला नुकसानभरपाई देण्याबाबतचे आदेश दिले होते. 35 लाख रुपये प्रतिगुंठाप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, असेही म्हटले आहे. त्यामुळे एकूण महानगरपालिकेला 20 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत, असे मंगळवारी झालेल्या महानगरपालिकेच्या तातडीच्या बैठकीत कायदा सल्लागारांनी सांगितले.

Advertisement

याबाबत महानगरपालिकेमध्ये घाईगडबडीत ठराव करण्यात आला. विरोधी गटाने त्याला आक्षेप घेतला. मात्र सत्ताधारी गटाने तो ठराव मंजूर केला आहे. ठराव मंजूर केला तरी ठरावाची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे गुरुवारी महानगरपालिकेचे कायदा सल्लागार उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. याबाबत महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे नेमके प्रतिज्ञापत्र कशाप्रकारे दाखल करणार, हे मात्र समजू शकले नाही.

प्रांताधिकाऱ्यांच्या बँक खात्यात 20 कोटी कधी जमा होणार?

भूसंपादनासाठी प्रांताधिकारी यांच्या बँक खात्यात 20 कोटी रुपये डिपॉझिट ठेवणे गरजेचे होते. मात्र बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत रक्कम जमा केली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही रक्कम कधी जमा केली जाणार, हे पहावे लागणार आहे. अत्यंत घाईगडबडीत महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी गटाने 20 कोटी जमा करण्याबाबत ठराव केला. मात्र ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.