एएफसी महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा मार्चमध्ये
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे 1 ते 21 मार्च 2026 दरम्यान एएफसी महिलांची आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा भरविली जात असून या स्पर्धेत एकूण 12 संघांचा समावेश राहील. या स्पर्धेच्या काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये भारत, जपान, व्हिएतनाम आणि चीन तैपेई यांचा क गटामध्ये समावेश करण्यात आला आहे.
सिडनीतील टाऊन हॉलमध्ये या स्पर्धेच्या काढण्यात आलेल्या ड्रॉ समारंभामध्ये भारतीय फुटबॉल संघातील मध्यफळीत खेळणारी संगीता बेसफोर उपस्थित होती. या स्पर्धेत सहभागी होणारे 12 संघ तीन गटात विभागण्यात आले असून प्रत्येक गटामध्ये चार संघांचा समावेश आहे. या स्पर्धेतील भारतीय महिला फुटबॉल संघ आपल्या मोहिमेला 4 मार्च 2026 रोजी व्हिएतनामबरोबरच्या सामन्याने सुरुवात करणार आहे. भारतीय महिला संघाचा या स्पर्धेतील दुसरा सामना पर्थ येथे 7 मार्च रोजी जपानबरोबर होईल तर भारत आणि चीन तैपेई यांच्यातील सामना 10 मार्च रोजी वेस्टर्न सिडनी स्टेडियममध्ये खेळविला जाईल.
प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ तसेच प्रत्येक गटातील तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या संघातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारे चार संघ 2027 मध्ये ब्राझील येथे होणाऱ्या फिफाच्या महिला विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. तर उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेले संघ प्लेऑफ गटात प्रवेश करतील.
2011 साली फिफाची महिला विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या जपान संघाला फिफाच्या मानांकन यादीमध्ये सातवे स्थान देण्यात आले असून आशिया खंडातील हा मानांकनातील अव्वल संघ आहे. जपानने 2014 आणि 2018 साली महिलांची आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. पण 2022 साली जपानला चीनकडून हार पत्करावी लागल्याने त्यांची जेतेपदाची हॅट्ट्रीक हुकली होती. फिफाच्या मानांकन यादीत व्हिएतनामला 37 वे स्थान मिळाले आहे. 2023 फिफा महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत व्हिएतनामने पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शविला होता. चीन तैपेईचा संघ मानांकनात सध्या 42 व्या स्थानावर आहे. चीन तैपेईच्या महिला फुटबॉल संघाने 1980 च्या दशकामध्ये तीनवेळा एएफसी महिलांच्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. आता 2027 मध्ये होणाऱ्या महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी चीन तैपेईचा संघ पात्रता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करेल. भारतीय महिला फुटबॉल संघ सध्या फिफाच्या मानांकनात 70 व्या स्थानावर आहे.
2026 महिलांच्या एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या काढण्यात आलेल्या ड्रॉनुसार अ गटात यजमान ऑस्ट्रेलिया, कोरिया प्रजासत्ताक, इराण व फिलीपिन्स तर ब गटात द. कोरिया, चीन, बांगलादेश आणि उझबेकिस्थान यांचा समावेश आहे.