‘त्या’ कुटुंबीयांना कर्जफेडीसाठी मुदत देण्याची सूचना
काही महिन्यांत संपूर्ण कर्जफेड करण्याचे आश्वासन
बेळगाव : तालुक्यातील कडोली येथील एका शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी संस्थेकडून कर्जफेडीचा तगादा लावल्याने आत्महत्या केली. सातेरी रुटकुटे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे मृताचे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण कुटुंबीय रस्त्यावर आले असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे संस्थेकडून घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सदर मृत कुटुंबीयांना काही महिन्यांची मुदत देण्याची मागणी राज्य रयत संघटना व हसिरू सेनेच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. रुटकुटे यांनी एका खासगी सोसायटीकडून घरबांधकामासाठी 12 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यापैकी 4 लाख रुपयांची त्यांनी परफेड केली होती. मात्र शेतातील भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाल्याने वेळेवर कर्जाचे हप्ते फेडता आले नाहीत. यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन संपूर्ण कर्ज फेडीसाठी तगादा लावला. याच्या मानसिकतेतूनच रुटकुटे यांनी आत्महत्या केली.
कर्जफेडीसाठी 6 महिन्यांची मुदत देण्याची सूचना
घटनेनंतर संस्थेकडून घर लिलावाद्वारे कर्जफेडीसाठी कुटुंबीयांकडे तगादा लावण्यात येत आहे. मात्र घरच्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीही कुटुंबीय कर्जफेडीसाठी मुदत मागत असून काही महिन्यात संपूर्ण कर्जफेड करण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी आपल्याला सहकार्य करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेला कर्जफेडीसाठी 6 महिन्यांची मुदत देण्याची सूचना करू, असे आश्वासन दिले. यावेळी फारुक तहसीलदार, सुभाष धायगोंडे, मारुती कडेमनी, चंद्राम राजाई, फकिरा सदावर, दुंडाप्पा पाटील यांच्यासह शेतकरी, रहिवासी उपस्थित होते.