जाहिरात फलक हटविण्यास सुरुवात; चौकांनी घेतला मोकळा श्वास
बेळगाव : राज्योत्सव दिनानिमित्त चन्नम्मा चौकासह शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले शुभेच्छा फलक हटविण्यास महानगरपालिकेने शुक्रवार दि. 7 रोजी सुरुवात केली आहे. जाहिरात फलकामुळे झाकोळलेल्या चौकांनी मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. 1 नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेते, कन्नड संघटनांनी राणी चन्नम्मा चौकासह विविध ठिकाणी मोठमोठे शुभेच्छा फलक लावले होते. बहुतांश शुभेच्छा फलक बेकायदेशीररित्या लावण्यात आले असतानादेखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले होते. कोठेही जाहिरात फलक लावायचे असल्यास महानगरपालिकेकडून रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
पण सर्व नियम धाब्यावर बसवून शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. राज्योत्सव होऊन 6 दिवस उलटले तरीही शुभेच्छा फलक हटविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने चौकांची शोभा जाण्यासह फलक कधी कोसळून पडतील याचा नेम नव्हता. फलकांमुळे महापालिकेला एकही रुपया उत्पन्न मिळत नाही. तरीदेखील सदर फलक हटविण्याकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर शुक्रवारपासून जाहिरात फलक हटविण्याची मोहीम मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून हाती घेण्यात आली आहे. फलक हटविताना विरोध होईल या शक्यतेने पोलीस बंदोबस्तही घेण्यात आला होता. शुक्रवारी सर्वप्रथम चन्नम्मा चौकातून फलक हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या कारवाईमुळे विविध चौकांनी पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला आहे.