For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अडवाणी भाजपच्या उत्कर्षाचे शिल्पकार

07:10 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
अडवाणी भाजपच्या उत्कर्षाचे शिल्पकार
Advertisement

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ घोषित झाला आहे. अनेक चढउतारांनी युक्त अशा त्यांच्या देदिप्यमान राजकीय कार्यकालाचा हा यथोचित गौरवच होय. देशाच्या राजकारणातील, तसेच भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीतील अडवाणी यांचे योगदान अनन्यसाधारण असेच आहे. 1996 मध्ये 13 दिवसांसाठी, 1998 मध्ये 13 महिन्यांसाठी तर 1999 मध्ये जवळपास पाच वर्षांसाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात देशात भाजपप्रणित सरकारे स्थापन झाली होती. या तिन्ही सरकारांमध्ये त्यांनी उपपंतप्रधानपद आणि गृहमंत्रिपदाचे उत्तरदायित्व स्वीकारले होते. त्यांचा गृहमंत्रीपदाचा कालखंड अनेक महत्वाच्या निर्णयांनी गाजला. पण ज्यामुळे भारतीय जनता पक्षाला देशाच्या केंद्रीय सत्तेपर्यंत पोहचण्याची संधी मिळाली, त्या ‘रामजन्मभूमी’ आंदोलनातील त्यांची भूमिका अविस्मरणीय आहे. राजकारणातील महामेरु अशा या नेत्याला ‘भारतरत्न’ होण्याचा सन्मान मिळाल्याच्या निमित्ताने त्यांच्या समृद्ध जीवनपटाचे हे संक्षिप्त दर्शन...

Advertisement

काही ठळक वैशिष्ट्यो

  • संयमी, नियंत्रित भाषा पण विचारांची ठाम आणि परखड अभिव्यक्ती
  • उत्तम संघटना कौशल्य, स्वच्छ डागरहीत सार्वजनिक, राजकीय चारित्र्य
  • वयाच्या 96 व्या वर्षीही ठणठणीत प्रकृती, विचारांची, कृतीची स्पष्टता
  • संसदेच्या दोन्ही सभागृहांचे प्रदीर्घ काळ सदस्यत्व, संवेदनशील मनोवृत्ती

राजकारण आणि समाजकारण : प्रारंभीचा काळ

Advertisement

लालकृष्ण अडवाणी यांचा सामाजिक आणि राजकीय पाया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवर घातला गेला आहे. त्यांनी 1941 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. त्यांनी सहा वर्षे कराची आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये संघाच्या शाखा स्थापन करण्यात महत्वाचे योगदान दिले होते.

जनसंघाचे कार्य

  • डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांनी 1950 मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1951 मध्ये अडवाणी यांनी जनसंघात प्रवेश केला. त्यांची नियुक्ती ज्येष्ठ नेते सुंदरसिंग भंडारी यांचे सचिव म्हणून झाली. नंतरच्या काळात ते राजस्थानात जनसंघाचे सचिव झाले. 1957 मध्ये ते दिल्ली जनसंघाचे नेते झाले.
  • 1967 मध्ये दिल्ली महानगरपालिका निवडणूक जनसंघाने जिंकल्यानंतर त्यांची नियुक्ती महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली. ते या पदावर 1970 पर्यंत होते. या काळात त्यांनी दिल्लीतील पायाभूत सेवा आणि सुधारणा या क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी केली. जनसंघाचा पाया भक्कम झाला.

जनसंघाचे अध्यक्षपद 

  • 1970 मध्ये त्यांची दिल्ली विधानसभेतून राज्यसभेवर निवड झाली. 1976 पर्यंत ते या सभागृहाचे सदस्य होते. या काळात त्यांनी जनहिताचे अनेक मुद्दे सभागृहात उठविले. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांना 1973 मध्ये जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बनविण्यात आले.
  • 1970 नंतर 1976 आणि 1982 अशा आणखी दोन वेळा अडवाणी यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली होती. अशा प्रकारे त्यांनी या सभागृहाचे सदस्यत्व सलग तीनवेळा स्वीकारले होते. त्यांची अभ्यासू आणि संयत भाषणे त्यावेळी मोठ्या प्रमाणात गाजली. मोठ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली.

जनता पक्ष, केंद्रीय मंत्रीपद

  • 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणीची घोषणा केली. 1977 मध्ये ती उठवून लोकसभेची निवडणूक घोषित केली. सर्व मोठ्या विरोधी पक्षांनी एकत्र येत जनता पक्षाची स्थापना करत या निवडणुकीत विजय मिळविला. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात ते सूचना प्रसारण मंत्री झाले.
  • 1979 मध्ये जनता प्रयोग फसला. 1980 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचा विजय झाला. त्यामुळे अडवाणींनाही केंद्रीय मंत्रिपद गमवावे लागले. सूचना प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी आकाशवाणी आणि मर्यादित प्रमाणात असलेल्या दूरदर्शनमध्ये सुधारणा होण्यासाठी पावले ठोस उचलली.

भारतीय जनता पक्षाची स्थापना

  • 1980 मध्ये जनता पक्षातून बाहेर पडून पूर्वाश्रमीच्या जनसंघ नेत्यांनी भारतीय जनता पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केली, जो पक्ष आज केंद्रात पूर्ण बहुमताने सत्तेवर आहे. वाजपेयी यांच्याप्रमाणे अडवाणीही या पक्षाच्या संस्थापकांमध्ये एक आहेत. वाजपेयींची निवड अध्यक्षपदी करण्यात आली.
  • स्थापना झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जनसंघापेक्षा थोडी वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न प्रारंभी केला. इतर विरोधी पक्षांमध्ये आपली स्वीकारार्हता वाढावी यासाठी गांधीवादी समाजवादाचा स्वीकार केला. येथे प्रथम वाजपेयी आणि अडवाणी यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचे त्यावेळी बोलले जात होते.
  • 1984 च्या पक्षाच्या प्रथमच लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव होऊन अवघ्या 2 जागा पदरात पडल्या. इंदिरा गांधीची हत्या झाल्याने निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत पक्षाची वाताहात झाली. वाजपेयींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पक्षाने गांधीवादी समाजवाद सोडण्याचे ठरविले.

दृष्टीक्षेपात अडवाणी...

  • जन्म : 8 नोव्हेंबर 1927 (सध्याच्या पाकिस्तानातील कराची येथे)
  • मातापिता : ग्यानीदेवी अडवाणी आणि किशनचंद अडवाणी
  • शिक्षण : सेंट पेट्रिक उच्चमाध्यमिक शाळा, ब्रिटीश भारतातील कराची
  • उच्च शिक्षण : डी. जी. नॅशनल कॉलेज, हैदराबाद, सिंध प्रांत
  • भारतात आगमन : भारताच्या फाळणीनंतर 1947 मध्ये मुंबई येथे
  • विधीशिक्षण : गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई येथून विधी शिक्षणात पदवी
  • विवाह : कमला यांच्याशी फेब्रुवारी 1965 मध्ये मुंबई येथेच
  • अपत्ये : पुत्र जयंत आणि कन्या प्रतिभा, प्रतिभा या टीव्ही निर्मात्या आहेत.
  • पत्नीचे निधन : वृद्धापकाळामुळे 6 एप्रिल 2016 या दिवशी दिल्लीत
  • सध्या वास्तव्य : 96 वर्षांचे अडवाणी कुटुंबासमवेत दिल्लीत वास्तव्यास.

पत्रकार अडवाणी

पत्रकारितेच्या क्षेत्रातही लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांची चमक दाखविली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणाऱ्या ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकाचे ते अनेक वर्षे संपादक होते. अनेक लोकप्रिय वृत्तपत्रे आणि नियतकालीकांमधून त्यांचे परखड लेख प्रसिद्ध झालेले आहेत. ‘ अ सॉफ्टस्पोकन हार्डलाईनर’ असे त्यांचे वर्णन एकेकाळी समाजवादी नेते मधू दंडवते यांनी केले होते.

सात वेळा लोकसभेवर

1989 मध्ये नवी दिल्ली, 1991 मध्ये नवी दिल्ली आणि गांधीनगर, 1998 मध्ये गांधीनगर, 1999 मध्ये गांधीनगर, 2004 मध्ये पुन्हा गांधीनगर, 2009 मध्ये गांधीनगर तर शेवटची लोकसभा निवडणूकही त्यांनी 2014 मध्ये गांधीनगरमधूनच जिंकली होती. अशा प्रकारे ते सहा वेळा गांधीनगर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र, 1996 ची लोकसभा निवडणुकीत त्यांनी सहभाग घेतला नाही. त्यावेळी त्यांच्यावर जैन हवाला प्रकरणी आरोप झाले होते. त्यातून मुक्त झाल्याशिवाय संसदेत प्रवेश करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. अशा प्रकारे ते लोकसभेचे 26 वर्षे तर राज्यसभेचे 18 वर्षे सदस्य होते.

आयुष्यातील परमोच्च क्षण

अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी साकारत असलेल्या भव्य राममंदिराच्या गर्भगृहात भगवान रामलल्लांच्या मूर्तीची 22 जानेवारी 2024 या दिवशी प्राणप्रतिष्ठा होणे हा लालकृष्ण अडवाणी यांच्या जीवनातील सर्वात अभिमानाचा आणि परमोच्च आनंदाचा क्षण आहे. त्यांनी स्वत:चे असे स्पष्ट पेले आहे. याच क्षणासाठी एकेकाळी त्यांनी आपले राजकीय भवितव्यही पणाला लावले होते. अटकेची व्यथा भोगली होती आणि कटकारस्थान केल्याच्या आरोपालाही तोंड दिले होते. त्यांच्या सत्ताकाळात भव्य राममंदीर होऊ शकले नाही. मात्र, त्यांच्याच मुशीत तावून सुलाखून निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कार्य पूर्णत्वास नेले आहे.

वादाचे अनेक प्रसंग

त्यांच्या या प्रदीर्घ राजकीय जीवनात वादाचेही अनेक प्रसंग आलेले आहेत. गांधींवादी समाजवादावरुन प्रथम अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांचे मतभेद होते अशी चर्चा होती. नंतर 2013 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यास त्यांचा विरोध असल्याचीही चर्चा होती.2005 मध्ये ते लोकसभेत विरोधी पक्षनेते असताना त्यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता.  त्यावेळी त्यांनी मोहम्मद अली जीना यांच्या थडग्यावर डोके टेकले असे वृत्त पसरले होते. तथापि, त्यांनी या वृत्ताचा ठाम इन्कार केला होता. मात्र, या अपप्रचारामुळे त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला खूपच मोठा धक्का पोहचला होता.

रथयात्रेचा झंझावात

1989 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बहुमत गेले. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वात जनदा दलाचे सरकार आले. या सरकारला भारतीय जनता पक्षाने आणि डाव्या आघाडीने बाहेरुन पाठिंबा देऊन बहुमत दिले होते. 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी देशव्यापी रामरथयात्रेचा प्रारंभ केला. या यात्रेला लोकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात्रा बिहारमध्ये प्रवेश करण्याच्या क्षणी तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी ती आडविण्याचा आदेश दिला. अडवाणींना अटक करण्यात आली. मात्र, त्याचा उलटाच परिणाम झाला. या अडथळ्यामुळे रामजन्मभूमी आंदोलन आणि भारतीय जनता पक्ष यांचा प्रभाव अधिकच वाढला. भारताच्या राजकारणाची जणू दिशाच पालटून गेली आहे.

उपपंतप्रधानपद, गृहमंत्रिपद

खऱ्या अर्थाने 1998 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांची देशाच्या उपपंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले. ते त्यांनी समर्थपणे हाताळले. या कालखंडात उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहार या तीन मोठ्या राज्यांचे विभाजन होऊन उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड या तीन नव्या राज्यांची निर्मिती झाली. या कार्यात अडवाणींचा पुढाकार होता. या राज्यांची मागणी अनेक दशकांपासून होत होती. ती पूर्ण करण्याचे श्रेय प्रामुख्याने अडवाणींचे आहे. ते 6 वर्षे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते. त्यांचा तो कार्यकाल आजही अनेक अर्थांनी नावाजला जातो.

Advertisement
Tags :

.