पुढील वर्षापासून अत्याधुनिक स्मार्टकार्ड
वाहनाची मालकी पडताळणे सोपे : ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुकमध्ये क्यूआर कोड
वार्ताहर /बेंगळूर
राज्य परिवहन खाते नव्या पद्धतीचे ड्रायव्हिंग लायसन्स व वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) यांच्यामध्ये क्यूआर कोड समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. सध्या देण्यात येणाऱ्या सर्व स्मार्टकार्डमध्ये फक्त चिप बसविण्यात आली आहे. पण यापुढे नव्याने जारी करण्यात येणाऱ्या स्मार्टकार्डमध्ये चिपसह क्यूआर कोड असणार आहे. त्यात वाहन मालकाची संपूर्ण माहिती असेल. स्मार्टकार्डचा पुरवठा करण्यासाठी करारबद्ध झालेल्या कंपनीने गेल्या 15 वर्षांत परिवहन खात्याला 2 कोटी वाहनचालक परवाने व आरसी बुक तयार करून दिले आहेत. ही दोन्ही कार्डे 2009 पासून स्मार्टकार्ड स्वरुपात जारी वितरित केली जात आहेत. या कराराची मुदत फेब्रुवारी 2024 मध्ये संपणार आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन खात्याने नव्या स्वरुपाचे स्मार्टकार्ड आणण्याचा निर्णय घेतला आहे.
एकरुपतेचे उद्दिष्ट
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने विहित केलेली वैशिष्ट्यो यांचा समावेश नवीन स्मार्ट काडर्समध्ये असणार आहे. डीएल व आरसी बुक देशभरात एकसमान असावेत, हा यामागचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने ही प्रणाली अंमलात येणार आहे. सध्या दिलेल्या कार्डांच्या तुलनेत, अत्याधुनिक स्मार्ट कार्डमध्ये वाहन मालक व वाहनाबद्दल अधिक माहिती नमूद असेल.
प्रस्तावित नवीन डीएल, आरसी कशी असेल?
ड्रायव्हिंग लायसन्सच्या पुढच्या बाजूला कार्डधारकाचे नाव, वैधता कालावधी, जन्मतारीख, रक्तगट, फोटो व पत्ता असणार आहे. तसेच वाहनप्रकार, आपत्कालीन संपर्क क्रमांक यासारखी माहिती क्यूआर कोडमध्ये नोंद केलेली असेल. त्याचप्रमाणे आरसी कार्डच्या पुढील बाजूला नोंदणी क्रमांक, नोंदणीची तारीख, वैधता कालावधी, चेसिस व इंजिन क्रमांक, मालकाचा तपशील आणि पत्ता असेल. मागील बाजूस असलेल्या क्यूआर कोडमध्ये उत्पादक कंपनीचे नाव, मॉडेल, वाहन प्रकार, आसन क्षमता या तपशिलांसह इतर माहिती असेल. क्यूआर कोड असणारे स्मार्ट कार्ड दिले जाणार असल्याने आरटीओ व गस्तीवरील पोलिसांसह इतर खात्यांच्या अधिकाऱ्यांना वाहनचालक आणि मालकांच्या तपशिलांची सहज पडताळणी करता येणार आहे. ऑक्टोबरमध्ये राज्यात सुमारे 5 हजार वाहनांची नोंदणी झाली होती आणि 4 हजाराहून अधिक वाहनचालक परवान्यांचे वितरण करण्यात आले होते. राज्य सरकारने चालू कराराचा कालावधी संपण्यापूर्वी अत्याधुनिक स्मार्ट कार्ड पुरवण्यासाठी निविदा प्रक्रिया जारी केली आहे.
फक्त नवीन कार्डांसाठीच...
फेब्रुवारी 2024 च्या पूर्वी नवीन स्मार्ट कार्ड जारी केले जातील. त्यामध्ये चिप आणि क्यूआर कोड या दोन्हीचा समावेश असेल. सध्या वाहन परवाना आणि आरसी बुक असणाऱ्यांना कोणतेही नवीन कार्ड मिळणार नाही. फक्त नूतनीकरणाच्या वेळी नव्या स्वरुपाचे कार्ड मिळेल.