For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अ‍ॅड. उज्ज्वल निकम राज्यसभेचे खासदार

06:59 AM Jul 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
अ‍ॅड  उज्ज्वल निकम राज्यसभेचे खासदार
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार नव्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रातील माजी सरकारी वकील आणि लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अ‍ॅड. उज्ज्वल देवराव निकम यांच्यासह चार प्रतिष्ठित व्यक्तींची ‘राष्ट्रपती नामनिर्देशित’ सदस्य म्हणून वर्णी लावली आहे. याशिवाय केरळचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ सी. सदानंदन मास्टर, भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि इतिहासकार-शिक्षणतज्ञ डॉ. मिनाक्षी जैन हेदेखील राज्यसभेत जाणार आहेत. अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे 26/11 मुंबई हल्ल्यासह अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणांमध्ये सरकारी वकील राहिले आहेत.

राष्ट्रपतींनी रविवारी जाहीर केलेल्या चारही नियुक्त्या यापूर्वी नामांकित सदस्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी करण्यात आल्या आहेत. भारतीय संविधानाच्या कलम 80 (3) अंतर्गत राष्ट्रपतींना राज्यसभेत 12 सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा यासारख्या क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल हे सदस्य निवडले जातात. नव्या चार सदस्यांच्या नियुक्तीविषयीची अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे.

Advertisement

भारतीय संसदेत लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन सभागृहे आहेत. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. सध्या राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या 245 आहे. यामध्ये 233 निवडून आलेले आणि 12 नामनिर्देशित सदस्य आहेत. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षे असतो आणि दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे मुख्य काम कायदे तयार करणे हे आहे. यासाठी प्रथम सभागृहात एक विधेयक मांडले जाते. नंतर त्यावर चर्चा केली जाते, त्यानंतर ते सर्वांच्या संमतीने किंवा मतदानाने मंजूर केले जाते. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रुपांतर होत असते.

राज्यसभेचे सदस्य जनतेद्वारे थेट निवडले जात नाहीत, तर अप्रत्यक्षपणे निवडले जातात. म्हणजेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे (आमदार) निवडून आलेले सदस्य या सदस्यांना निवडतात. राज्यातील राज्यसभेच्या रिक्त जागांच्या संख्येनुसार राज्यातील आमदारांच्या संख्येवर मतदान केले जाते. अशा प्रकारे राज्यसभेचे सदस्य निवडले जातात. मात्र, राष्ट्रपतींना राज्यसभेत 12 सदस्य नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकार ही नावे राष्ट्रपतींना सुचवते आणि नंतर राष्ट्रपती त्यांना नामनिर्देशित करतात. प्रत्येक क्षेत्रातील जाणकार लोक संसदेत समाविष्ट करून त्यांचा अनुभव आणि मत कायदे करण्यात मदत करू शकतील, असा मनोदय यामागे आहे. त्यानुसार आता राष्ट्रपतींनी चार नव्या सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

नवोदित खासदारांची ओळख...

अ‍ॅड. उज्ज्वल निकम : (वय : 72 वर्षे, जळगाव-महाराष्ट्र, माजी सरकारी वकील)

ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम देशातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित सरकारी वकिलांमध्ये गणले जातात. त्यांनी 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून खटला, प्रमोद महाजन खून खटला, 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील अजमल कसाबचा खटला आणि 2016 च्या कोपर्डी बलात्कार खटल्यासारख्या अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणांमध्ये खटल्याचे नेतृत्व केले आहे. सध्या ते महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. त्यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उज्ज्वल निकम यांना भारतातील न्यायव्यवस्थेच्या ताकदीचे प्रतीक मानले जाते. यापूर्वी गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीचे उमेदवार बनवले होते. मात्र, त्यांचा पराभव झाल्याने ते संसद खासदार बनू शकले नव्हते. आता राज्यसभेतील नियुक्तीमुळे ते कायदा क्षेत्रातील अनुभवाचा लाभ देशाला मिळवून देतील असे मानले जात आहे.

सी. सदानंदन मास्टर : (वय : 61 वर्षे, कन्नूर-केरळ, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ)

सी. सदानंदन मास्टर केरळमधील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ आहेत. ते राष्ट्रीय शिक्षक संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि ‘नॅशनल टीचर्स न्यूज’चे संपादक देखील आहेत. त्यांनी 1994 मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी एका राजकीय हल्ल्यात दोन्ही पाय गमावले आहेत. मात्र, कृत्रिम पाय लावून ते वावरताना दिसतात. आज वयाची ‘साठी’ पार करूनही ते समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात सक्रियपणे सेवा बजावत आहेत. संघ कार्यकर्ते म्हणूनही ते परिचित आहेत. त्यांच्या नियुक्तीकडे सामाजिक सेवेतील योगदानाचे कौतुक म्हणून पाहिले जात आहे. त्यांचा उत्साह आणि काम करण्याची शैली कौतुकास्पद आहे. आजही सदानंदन मास्टर हे केरळमधील राजकीय हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवत आहेत. राजकीय मतभेद असूनही समाजात शांतता राखणे महत्त्वाचे असल्याचे ते वारंवार सांगत आले आहेत. केरळमधील वैचारिक आणि सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या भारतीय विचार केंद्राशीही ते संबंधित आहेत. त्यांच्या पत्नी वनिता राणी देखील शिक्षिका आहेत. त्यांची मुलगी यमुना भारती ही बी.टेकची विद्यार्थिनी आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब शिक्षण आणि समाजसेवेशी जोडलेले आहे.

हर्षवर्धन श्रृंगला (वय : 63 वर्षे, दार्जिलिंग-पश्चिम बंगाल, माजी आयएफएस अधिकारी)

हर्षवर्धन श्रृंगला माजी परराष्ट्र सचिव आहेत. ते 1984 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत. आपल्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर सेवा बजावताना अमेरिका, बांगलादेश आणि थायलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. त्यांनी फ्रान्स (युनेस्को), अमेरिका (संयुक्त राष्ट्र), व्हिएतनाम, इस्रायल आणि दक्षिण आफ्रिका येथेही काम केले आहे. ते 2020 ते 2022 पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव होते. भारताच्या धोरणात्मक परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात त्यांची भूमिका उल्लेखनीय आहे. अलिकडेच श्रृंगला यांनी भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात मुख्य समन्वयक म्हणून मोलाची भूमिका बजावली होती. कोविड-19 महामारी, भारत-चीन सीमा तणाव आणि जागतिक राजनैतिक बदलांदरम्यान त्यांनी परराष्ट्र धोरणाचे दिशानिर्देश दिले. सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवीधर झालेले हर्षवर्धन यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत येण्यापूर्वी कॉर्पोरेट आणि सार्वजनिक क्षेत्रातही काम केले आहे. आता श्रृंगला हे राज्यसभेत आपला आवाज मजबूत करताना दिसतील.

- डॉ. मिनाक्षी जैन (वय : 65 वर्षे, दिल्ली, इतिहासकार, लेखिका, शिक्षणतज्ञ)

डॉ. मिनाक्षी जैन ह्या प्रसिद्ध इतिहासकार आणि प्राध्यापिका आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमध्ये बरीच वर्षे इतिहास या विषयाचे अध्यापन केले. याशिवाय, त्यांनी नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, आयसीएचआर आणि आयसीएसएसआर सारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात पीएचडी केली आहे. भारतीय सांस्कृतिक वारशावरील त्यांच्या संशोधनकार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्या ‘राम आणि अयोध्या’, ‘सती’ आणि ‘देवतांची उ•ाण’ यासारख्या प्रसिद्ध पुस्तकांच्या लेखिका आहेत. 2020 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्या प्रामुख्याने भारतीय इतिहास आणि परंपरांवरील संशोधनासाठी ओळखल्या जातात. राज्यसभेवरील त्यांची नियुक्ती भारतीय संस्कृती, इतिहास आणि शैक्षणिक प्रगतीला एक नवीन दिशा देऊ शकते.

Advertisement
Tags :

.