बार असोसिएशनच्या प्रभारी अध्यक्षपदी अॅड. बसवराज मुगळी
आज कमिटीची सर्वसाधारण सभा : वर्धापनदिन कार्यक्रमाविषयी होणार चर्चा
बेळगाव : बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर यांच्यावर शनिवारी अविश्वास ठराव पारित झाल्याने प्रभारी अध्यक्ष म्हणून बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. बसवराज एम. मुगळी यांची निवड करण्यात आली आहे. बार असोसिएशनला यंदा दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने पुढील महिन्यात वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, आता या कार्यक्रमाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. कार्यक्रम पुढे ढकलण्याची शक्यता असून याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवार दि. 22 रोजी दुपारी 12.30 वाजता बार असोसिएशनच्या सभागृहात प्रभारी अध्यक्ष अॅड. मुगळी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव न्यायालयात तीन बोगस वकील प्रॅक्टीस करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार काही वकिलांनी 26 नोव्हेंबर 2024 रोजी बार असोसिएशनकडे केली होती. मात्र, संबंधितांवर कारवाई करण्याचा अधिकार बार असोसिएशनला नसल्याने त्यांनी न्यायालय तसेच राज्य बार असोसिएशनला पत्रव्यवहार केला होता.
मात्र, तक्रार करूनही बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले नसल्याचा ठपका ठेवत अॅड. सानिकोप्प यांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात 455 वकिलांच्या सह्या असलेली रिट पिटिशन दाखल करून अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने तातडीने विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्याचा आदेश बार असोसिएशनला बजावला होता. त्यानुसार शनिवार दि. 20 रोजी बार असोसिएशनच्या सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित वकिलांनी अविश्वास ठराव आणण्यासाठी मतदान घेण्याची जोरदार मागणी केली. त्यानुसार अॅड. विनय मांगलेकर, अॅड. के. बी. नाईक यांच्या निरीक्षणाखाली बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे ठरले. त्यानुसार दुपारी 3.30 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. एकूण 629 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
428 जणांनी विद्यमान बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. किवडसण्णावर यांच्याविरोधात तर 194 जणांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. तसेच 7 मते अवैध ठरली. 428 जणांनी विरोधात मतदान केल्याने अध्यक्ष अॅड. किवडसण्णावर यांच्यावरील अविश्वास ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर सर्वानुमते उपाध्यक्ष अॅड. बसवराज मुगळी यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यंदा बेळगाव बार असोसिएशनला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने ऑक्टोबर महिन्यातील 4 आणि 5 तारखेला वर्धापनदिन आयोजित करण्यात आला आहे. यासाठी केंद्रीय व राज्य कायदा मंत्री त्याचबरोबर न्यायमूर्ती, न्यायाधीशांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यातच अध्यक्षांवर अविश्वास ठराव पारित झाल्याने वर्धापनदिन कार्यक्रमाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. सदर कार्यक्रम पुढे ढकलण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी प्रभारी अध्यक्ष अॅड. बसवराज मुगळी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पहिली बार असोसिएशन कमिटीची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण सभेचे आयोजन करून निर्णय घेतला जाणार आहे.