ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांना ‘कोकणरत्न पदवी पुरस्कार’
मालवण । प्रतिनिधी
विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना कोकण राज्य अभियानातर्फे दिला जाणारा कोकणरत्न पदवी पुरस्कार मालवण तालुक्यातील ॲड ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांना जाहीर झाला असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे . शनिवार १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबई आझाद मैदान जवळील मराठी पत्रकार भवन, येथे हा पुरस्कार स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहे.ॲड. मांजरेकर यांनी सामाजिक कार्य, युवा सक्षमीकरण, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि पर्यावरण संवर्धन या चारही क्षेत्रात सातत्याने आणि प्रभावी कार्य केल्याबद्दल यंदाचा प्रतिष्ठेचा ‘कोकण रत्न पदवी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराची घोषणा स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष श्री .संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली असून हा पुरस्कार कोकणातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. यावर्षीच्या निवडीमध्ये गुणवत्तेला, सातत्याला आणि समाजकारणातील प्रभावी योगदानाला विशेष महत्त्व देण्यात आले होते. सदर पुरस्कारासाठी १४०० पेक्षा जास्त नामांकन मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांतून आले होते, त्यापैकी निवडक व्यक्तींच्या सामाजिक कार्याची दखल पुरस्कारासाठी घेतली गेली. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार आणि संपादक श्री.सचिन कळझुनकर तसेच कोकणातील नामांकित व्यक्तीची उपस्थितीत लाभणार आहे. या आधी ऐश्वर्य मांजरेकर यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार २०२५ , शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ , महाराष्ट्र कोकण भूषण पुरस्कार २०२३ , महाराष्ट्र सह्याद्री युवा लोकगौरव पुरस्कार २०२२, महाराष्ट्र युथ आयडॉल युवा रत्न पुरस्कार २०२१ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.