अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी नौदलाचे नवे प्रमुख
आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारतीय नौदलाला करणार मजबूत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी मंगळवारी आर. हरि कुमार हे सेवानिवृत्त झाल्यावर 26 वे नौदलप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला आहे. दिनेश कुमार त्रिपाठी एक संचार आणि इलेक्ट्रॉनिक युद्धतज्ञ देखील आहेत. यापूर्वी ते नौदलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. 15 मे 1964 रोजी जन्मलेले त्रिपाठी हे 1 जुलै 1985 रोजी भारतीय नौदलात नियुक्त झाले होते.
नौदलाचे उपप्रमुख पद सांभाळण्यापूर्वी त्यांनी पश्चिम नौदलाच्या कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणूनही काम केले होते. भारतीय नौदलाच्या युद्धनौका विनाश, किर्च आणि त्रिशूलची धुरा त्यांनी सांभाळली आहे. विविध महत्त्वपूर्ण संचालन आणि स्टाफ नियुक्त्यांवरही त्यांनी काम केले असून यात पश्चिम ताफ्याचे संचालन अधिकारी, नौदलाच्या संचालनाचे निदेशक, प्रमुख निदेशक, नेटवर्क केंद्रीत संचालनचा समावेश आहे.
रियल अॅडमिरल म्हणून त्यांनी पूर्व ताफ्याचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग म्हणून कार्य केले. प्रतिष्ठित भारतीय नौदल अकॅडमी एझिमालाचे कमांडेंट म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. एनडीएचे माजी विद्यार्थी राहिलेले अॅडमिरल त्रिपाठी यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज-वेलिंग्टन, नेवल हायर कमांड कोर्स-करंजा आणि अमेरिकेत नेव्हल कमांड कॉलेजमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अतिविशिष्ट सेवा पदक आणि नौदल पदकाचे ते मानकरी ठरले आहेत.
नौदल झाले आहे विकसित
मागील काही वर्षांमध्ये आमचे नौदल एक युद्धासाठी सज्ज, एकजूट, विश्वसनीय आणि फ्यूचर-प्रूफ फोर्सच्या स्वरुपात विकसित झाले आहे. सागरी क्षेत्रातील वर्तमान आणि उदयास येणाऱ्या आव्हानांना पाहता भारतीय नौदलाला शांततेत समुद्रात संभाव्य विरोधकांना रोखण्यासाठी सदैव सज्ज रहावे लागेल आणि वेळ पडल्यास समुद्रात आणि समुद्रातून युद्ध जिंकावे लागणार आहे. यावरच माझे लक्ष केंद्रीत राहणार आहे. नव्या तंत्रज्ञानांना सादर करणे आणि विकसित भारतासाठी आमच्या सामूहिक शोधाच्या दिशेने राष्ट्रीय विकासाचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ होण्याच्या दिशेने, ‘आत्मनिर्भरतेच्या दिशेने, भारतीय नौदलाचे प्रयत्न मजबूत करणार असल्याचे उद्गार अॅडमिरल त्रिपाठी यांनी काढले आहेत.