प्रशासनाची अष्टसूत्री, डॉल्बीचं कंबरडं मोडणार
सातारा / दीपक प्रभावळकर :
'तरूण भारत'ने कर्णकर्कश डॉल्बीविरोधात उभारलेल्या लढ्याला आता राज्याचे स्वरूप मिळाले आहे. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी डॉल्बी आणि लेझरबंदीचा आदेश काढला. पण त्या आधीच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने कर्णकर्कश डॉल्बीचे कंबरडे मोडण्यासाठी ‘अष्टसूत्री’ चा अवलंब चालवलाय. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोसिएशन, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह अनेक सरकारी संस्थांनी तरूण भारतच्या डॉल्बीविरोधी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला आहे.
साताऱ्यात डॉल्बीमुळे भिंत पडून एक माणूस जीवंत गाडला गेला. दोन वर्षापूर्वी डॉल्बीच्या दणदणाटामुळे अख्ख घरं कोसळलं. 14 माणसे एकाच शहरात अपंग झाली. तरी साताऱ्यातल्या डॉल्बीचा थयथयाट कमी होत नसल्यामुळे यंदा तरूण भारतने कर्णकर्कश डॉल्बीच्याविरोधात एल्गार पुकारला. सामान्य जनतेकडून याला प्रचंड प्रतिसाद मिळतोयच. लोकप्रतिनिधींचे सुद्धा कान उघडले आहेत. त्यामुळे डॉल्बी विरोधातला हा लढा दहा दिवसाच्या उत्सवात सातव्या दिवसापर्यंत शंभर टक्के यशस्वी झालाय.
जलनायक ते डॉल्बीमुक्तनायक
सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागात बांधाबांधावर पाणी पोहोचवणारा जयकुमार गोरे जिल्ह्यातील जलनायक झाला. ते पुढे राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री आहेत. पालक झाल्यापासून जयकुमार यांनी प्रत्येक सोलापूरकराची काळजी घेतली. गेल्या विसर्जन मिरवणुकीत 6 जणांचे मृत्यू आणि 19 जणांचे अपंगत्व जयकुमार गोरे यांना इतकं त्रासदायक झालं की त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादला आदेश देऊन सोलापूरची डॉल्बी बंद केली. साताऱ्याचा जलनायक आता सोलापूरचा डॉल्बीविरोधी नायक बनला आहे. यंदाचा आषाढी एकादशी पालखी सोहळा अत्यंत सुनियोजित पद्धतीने साजरा केल्यामुळे सारा देश जयकुमार गोरेंचा जयजयकार करत असतानाच जयकुमार गोरे यांनी साताऱ्याचा आदर्श घेत सोलापुरात डॉल्बीमुक्तीचा आदेश जारी केला आहे. दरम्यान तरूण भारतच्या प्रश्नांना उत्तर देताना जयकुमार गोरे यांनी जो संदेश मी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिलाय त्याच संदर्भातील सूचना सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनाही देणार आहे, असे तरूण भारतला आश्वासन दिले. बघुया पुढचे चार दिवस सातारा जिल्हा संतोष पाटलांच्या हातात राहतोय का?
- "तरूण भारत डॉल्बीविरोधी नव्हेतर कर्णकर्कश आवाजाविरोधात आहे
मी घेतलेली भूमिका अनेकांना रूचली नाही. डॉल्बीवाल्यांनी धमक्या देण्याचाही प्रयत्न केला. असल्या धमक्यांना आम्ही कधीच भीक घातली नाही. मात्र हेही स्पष्ट करावे लागेल की तरूण भारतची भूमिका ही डॉल्बी व्यावसायिकांच्या विरोधात नाही. तुम्ही कायद्याच्या चौकटीत वयोवृद्ध, लहान बालके, गरोदर महिला आणि रूग्णांची काळजी घेऊन आपला डॉल्बी व्यवसाय केला तर आम्हीच काय राज्य शासनही आपल्याला सन्मान देत राहील. महाराष्ट्र शासनाने अशांसाठी राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा केली आहे. भंगरी डॉल्बीवाल्यांच्या नादाला न लागता कायद्याचे पालन करून माझ्या सातारा जिल्ह्यातील कित्येक डॉल्बीवाल्यांना हा पुरस्कार मिळाला तर आमचं आंदोलन 100 टक्के यशस्वी झालं हीच आमची भावना असेल.
- गैरवापर कराल तर चालणार नाही
मी केव्हाच डॉल्बी किंवा कर्णकर्कश आवाजाला समर्थन दिलेले नाही. उदयनराजे यांनी सुद्धा कायदा मोडून डॉल्बी वाजवा असं म्हटलेलं नाही. महाराजांच्या या केवळ सोशल मीडीयावरच्या मिम्स आहेत. उदयनराजे हे केवळ महाराज नव्हेतर इथल्या जनतेच्या गळ्यातील ताईत आहेत. ते कधीच जनतेविरोधात बोलणार नाहीत. तरूण भारतने व्हाईस पोलूशन अगेन्स्ट सुरू केलेल्या लढ्याला मी वेलकम करतेच. पण त्यापेक्षा तरूण भारतने वॉटल पोलुशन आणि शुगर फॅक्टरीमधून होणाऱ्या पोलुशनकडे पण लक्ष द्यावे. कोल्हापूर डिस्ट्रीक्टमध्ये वाढलेला कॅन्सर रेट हा डॉल्बीपेक्षा खुप भयानक आहे. आपण साऱ्यांनी या व्हाईस आणि वॉटल पोलुशनच्या विरोधात एकत्र मिळून फाईट सुरू करूया.
-श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले
- मी यापूर्वी पण व्हाईस पोलुशन आणि प्लास्टीक मुक्तीसाठी काम करतेय
मी साताऱ्यातच राहते. त्यामुळे प्रत्येक सातारकराची मला काळजी आहे. याविरोधात मी अनेकदा काम केले आहे. सातारकरांनी प्रतिसाद पण दिलाय. यंदाही कुठल्याच मंडळाने कायद्याच्या बाहेर जाऊन डॉल्बीचा वापर करू नये. लेझर तर अजिबात वापरू नये.
‘वहिनीसाहेब जर कुणी कायद्याचे उल्लंघन केलं, आवाज वाढवला तर?’
दीपकजी, मी कोणत्याही प्रशासकीय पदावर नाही. किंवा लोकप्रतिनिधी नाही. मी साताऱ्यातला माझ्या तमाम बंधू भगिनी आणि मंडळांना एक सामान्य नागरिक म्हणून विनंती करते की कुणीच कायद्याचे उल्लंघन करू नका.
कायदा कोणीच तोडू नका.
-श्रीमंत छत्रपती वेदांतीकाराजे भोसले
- गणेशोत्सवाला यंदा महाराष्ट्र उत्सवचा दर्जा
गणेशोत्सवाला यंदा महाराष्ट्र उत्सवचा दर्जा मिळाला आहे, तो नक्कीच उत्साहात आणि जोरदार पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे. या उत्सवात अधिकाधिक लोकांना सहभाग घ्यावा. हा उत्सव केवळ धार्मिक नव्हेतर आता महाराष्ट्र उत्सव झालाय. हे जरी असलं तरी कायद्याची मर्यादा कोणालाच तोडता येणार नाही. वयोवृद्धांपासून आबाल बालकांपर्यंत जर त्रास होणार असेल तर संबंधित गणेशोत्सव मंडळांनी सुद्धा सामाजिक भान राखले पाहिजे. गणेशोत्सव हा सामाजिक आहे, याचे भान सर्वांनी ठेवावे.
-सौ. स्मितादेवी देसाई
- उत्सवाला धार्मिक बंधने हवीत
गणेशोत्सव हा आम्हा कुटुंबीयांचा सर्वात मोठा उत्सव आहे. वाईचा महागणपती हे तर आम्हा साऱ्यांचे आराध्य. हा उत्सव आम्ही सार्वजनिक आणि धार्मिक पद्धतीने साजरा करतो. तरूण भारतकडून कळले की, ध्वनीप्रदूषणाच्या प्रादुर्भावाने अनेक दुर्घटना घडल्यात. आम्ही वाईकर सार्वजनिक उत्सवात आमच्या दैवताचा असा कधीच अवमान करणार नाही. आमच्या वाईचे बांधव महागणपतीचा हा सन्मान कोणत्याच गैरपद्धतीने मोडणार नाहीत. हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.
-सौ. अर्चना मकरंद पाटील
- चालकमंत्री मोठा की पालकमंत्री मोठा
साताऱ्यात डॉल्बी विरोधातला आवाज बुलंद होत असतानाच मंत्री शंभूराज देसाई यांनी कर्णकर्कश डॉल्बीला विरोध दाखवला. कायदा तोडणाऱ्यावर शिक्षा झाली पाहिजे, ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली. एकीकडे पालकमंत्र्यांनी आदेश काढला असताना ‘चालकमंत्र्यांनी त्यांच्यावर टांग टाकण्याचा प्रयत्न केलाय. सोलापुरात डॉल्बीबंदीचा आदेश निघाताच डॉल्बी चालकांनी एकत्र येऊन डॉल्बी चालवणार नाही, असा निर्णय घेतला. डॉल्बी चालकांचा हा प्रयत्न जणू गणरायाची शपथ घेत असल्या सारखाच होता. करोडोंची डॉल्बी असणाऱ्या या चालकांनी एकत्र येऊन जणू स्वराज्याची शपथ घेत असल्यागत हात पुढे करून ‘गणेशोत्सवात डॉल्बी बंदी केलीतर आम्ही यापुढे सार्वजनिक आणि वैयक्तिक कार्यक्रमात डॉल्बीवर वाजवणार नाही.’ अशी शपथ घेत पालकत्र्यांच्या आदेशावर चालकमंत्र्यांनी टांग टाकण्याचा प्रकार केला. हा बावळटपणा इतका होता की ‘जणू कुरेशी समाजाने आजपासून आम्ही मटण विकणार नाही, फक्त कोथंबीर आणि मेथी विकू असा म्हणल्यासारखा होता’. सोलापुरातल्या या डॉल्बी बहाद्दारांना शोधून काढून त्यांना समज देण्याची विनंती तरूण भारतने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे.
- सॅल्युट टू तुषार दोशी, साताऱ्याचा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा
वास्तविक प्रचंड गर्दी डॉल्बीचा ठणठणाट अशावेळी गुन्हे दाखल करणे बहुतेक अशक्यच होते. कारण असले पोकळ गुन्हे दाखल करण्याचे अधिकार हे पोलीस निरीक्षकांनाच होते. मात्र सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी 2014 चे कलम 33, 34, 36, 38 याच्या अन्वये कायद्याचा भंग करणारी, व्यक्तीसमूह, संघटना किंवा मंडळे यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार सामान्य हवालदार यांच्यापासून सर्व अधिकाऱ्यांना प्राप्त केले आहे. त्यामुळे मंडळाच्या मिरवणुकीवर देखरेख करणारा सामान्य हवालदार सुद्धा सातारा जिल्ह्याची अष्टसूत्री पाळून कर्णकर्कश डॉल्बीचे आणि उन्मादानाने भरलेल्या मंडळाचे कंबरडे मोडू शकतो. महाराष्ट्रात डॉल्बी लेझर विरोधात गुन्हे दाखल करण्याचे अधिकारी फक्त पोलीस निरीक्षकांना आहेत. सातारा पोलीस अधीक्षकांनी हे अधिकार त्यांच्या अधिकार क्षेत्रात सामान्य हवालदारांनाही दिल्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील मंडळांवर पोलीस निरीक्षकाची रिल्हाल्वर नव्हे तर हवालदाराचा दंडुका सुद्धा तितकेच मोठे काम करणार आहे.
- सोलापूरच्या कुमार आशीर्वादांना जमतयं तर सातारच्या संतोष पाटलांना का नाही?
सातारा तरूण भारतने सुरू केलेली डॉल्बी विरोधातील चळवळ राज्यभर फोफावली. सोलापुरात याला जोरदार प्रतिसाद मिळाला. सोलापूरच्या मोर्च्यात डॉक्टरांनीही सक्रीय सहभाग घेतला. लोकभावना लक्षात घेऊन कर्णकर्कश डॉल्बी आणि लेझरमुळे लोकांच्या दुखापतीची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे 27 ऑगस्ट 6 सप्टेंबर यामध्ये कोणत्याच मंडळाला डॉल्बी सिस्टीम आणि लेझर बीम वापरता येणार नाही. भारतीय सुरक्षा संहित 2023 कलम 163 (1) याच्या तरतुदीनुसार याला प्रतिबंध करणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झाल्यामुळे मी कर्णकर्कश डॉल्बी आणि लेझर बीमला प्रतिबंध करीत आहे, असा आदेश सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढलाय.
- पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी टोल फ्री नंबर करावा
प्रचंड डॉल्बीवर नाचणारे शेकडो असतात, पण लाखोंना त्रास होतो. याविरोधात कोणी तक्रारी केली तर संबंधित पोलीस अधिकारी मंडळात जाऊन आधीच सांगतो ‘माझी काय तक्रार नाय, अमूक तमूक व्यक्तीने तुमची तक्रार केलीय’ आणि त्यानंतर तक्रार करणाऱ्या अमूक तमूक व्यक्तीवर संबंधित मंडळ किंवा गल्ली वर्षभर डूख धरून ठेवती. यामुळे सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी डॉल्बी विरोधात तक्रार करणाऱ्यांसाठी टोल फ्री नंबर करून तक्रारदार आणि तक्रारदाराचा नंबर गोपनीय ठेवावा. तसेच गोपनीयरित्या घटनेची आणि तक्रारदाराची चौकशी केली तरी चालेल, पण दोशी साहेबांनी तक्रारदारांना अभय द्यावे.
- अतुलबाबा डॉल्बीविरोधातील दिंडी तुमच्या खांद्यावर घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेक कारणांनी कौतुक होते. त्यातील एक म्हणजे मोदींनी एका ऑलिम्पिक विजेत्याला केंद्रीय क्रीडामंत्री केले. फॉरेन अफयेर्स मिनिस्ट्रीमध्ये सर्वाधिक अनुभव असणाऱ्या जयशंकर यांना फॉरेन अफेयर्स मिनिस्ट्रर केले. तसेच ऐन कोविडच्या काळात मुळत: डॉक्टर असणाऱ्या हर्षवर्धन यांना केंद्रीय आरोग्यमंत्री केले. नरेंद्र मोदींचं हे तत्व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष असलेल्या आमदार अतुल भोसले यांना पडत नाही का? सातारा जिल्ह्याच्या इतिहासात दुसऱ्यांदा आणि कराड शहराच्या इतिहासात पहिल्यांदा कराडला एक ‘डॉक्टर आमदार मिळालाय’ अतुल भोसले केवळ डॉक्टरच नव्हेतर निष्णांत कॅन्सरतज्ञ डॉ. सुरेश भोसलेंचे थोरले चिरंजीव आहेत. अतुल भोसलेचं केवळ कृष्णा हॉस्पिटल, कॉलेज इतकेच नव्हेतर विद्यापीठही आहे. मग लोकांना अपंग, कर्णबधीर इतकेच काय जीव घेणाऱ्या डॉल्बी विरोधातील दिंडी पहिल्यांदा अतुल भोसलेंनी खांद्यावर घेतली पाहिजे. आमदार डॉ. अतुलबाबा तुमच्या संस्थेच्या कृपेने करोडो रूण्ण बरे झालेत. पण आज तुमच्या हातात मतदार रूग्ण होऊच नयेत, हे अधिकार आहेत. कराडचे आमदार म्हणून तुम्ही कराडमध्ये आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्यामध्ये डॉल्बी विरोधातील दिंडी खांद्यावर घेतली नाही तर येणारे चार दिवस तुम्हाला विसरणार नाहीत. आमदार अतुलबाबा भोसले यांनी डॉल्बी मुक्त कराडचा नारा यशस्वी केला तर बाबा सातारा जिल्ह्याला पाचवा मंत्री मिळायला कोणतीच हरकत राहणार नाही.
- कराडची संस्कृती इतकी बिघडली आहे काय?
सातारा ही स्वराज्याची राजधानी असली तरी कराड शहराला त्याच्या आधी कित्येक शतकांचा इतिहास आहे. वाई ही साताऱ्याची सांस्कृतिक राजधानी असली तरी कराडने केव्हाच गावाची संस्कृती सोडली नाही. गेल्याच महिन्यात कराडची ग्रामदैवता असलेल्या कृष्णामाईची पालखी निघाली.
- गणपती दहा हजाराचा आणि डॉल्बी पाच लाखाची
व्यक्तीश: किंवा मंडळांचा अवमान करणे हा आमचा कधीच उद्देश नव्हता. मात्र एका मंडळाने भरभक्कम वर्गणी गोळा करून केलेल्या खर्चात गणेशमूर्ती दहा हजाराची आणि डॉल्बी 3 लाखाची बोलवली आहे. त्यामुळे असल्या भंपक मंडळांना यापुढे गणेशोत्सव मंडळ म्हणावे की डॉल्बी उत्सव मंडळ इतका संतापजनक प्रश्न लोकांमध्ये निर्माण झालाय.
- गणपती पुढे कुत्रे बसलयं आणि भुतं बघायला शेकडोंची रांग
कोणाच्याच धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत. विघ्नहर्ता गणराया आणि दत्तात्र्यांचे श्वान आम्हासाठी वंदनीय आहे. मात्र हा प्रसंगी सातारा शहरातल्या शिवतीर्थ (पोवई नाका) परिसरातला आहे. उलट्या काळजाच्या लोकांनी आजच खात्री करावी. सातारा शिक्षक बँकेने गणपती मंडळ केलय. सुबक मूर्ती आहे. भव्य देखावा आहे. पण त्यापुढे सामान्य भक्तजन, कार्यकर्ते कुणीच नाही. मंडळाच्या स्टेजवर कुत्रं बसलय. आणि त्याच्याबरोबर समोर अवघ्या 40 फुटावर .... एक गणेश मंडळ आहे. त्यांनी भुताचा देखावा केलाय. गुहेत शिरल्यानंतर 7 भुतं वेगवेगळे मुखवटे घालून तुम्हाला भुताची भीती दाखवतात. या भुतांना बघण्यासाठी शिक्षक बँकेपासून शिवतीर्थ पर्यंत हजारोंची रांग लागलेली असते. कळतच नाही लोकांना गणेशोत्सवात गणपती बघायचा की भुतं बघायची. कर्णकर्कश डॉल्बी हे निमित्तं झालंय. तरूण भारतची मुळची भूमिका सार्वजनिक गणेशोत्सवात पावित्रता आणायची आहे, यासाठीच हा सगळा लेखनप्रपंच
- कर्णकर्कश डॉल्बी वाजवल तर भोगायला तयार व्हा !
सातारा जिल्हा पोलीस दलाने आता केवळ हरित लवादाचा पोकळ कायदा बाजूला ठेवून कर्णकर्कश डॉल्बीवाल्यांना नियंत्रणात आणण्यासाठी अष्टसूत्री तयार केलीय. ती पुढील प्रमाणे
1) सार्वजनिक शांततेचा भंग-कायदा: बीएनएस 252 - शिक्षा : दोन वर्षापर्यंत कारावास, दंड, किंवा दोन्ही.
2) डॉल्बी वेळेचे बंधन - कायदा : ध्वनीप्रदूषण 2022 - शिक्षा : एक ते पाच लाख रूपये दंड.
3) विनापरवाना डॉल्बी, आदेशाचे उल्लंघन - कायदा : बीएनएस 223, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33, 36, 38- शिक्षा : सहा महिने कारावास.
4) सार्वजनिक नुकसान - कायदा : 1984 कलम 3 व 4- शिक्षा : पाच वर्षापर्यंत कारावास.
5) वाहतुकीस अडथळा - बीएनएस 126 (2) वाहतूक नियम 112 (18), शिक्षा : एक महिने कारावास.
6) राजकीय कामात अडथळा - कलम बीएनएस 126 (2), 122, 118- शिक्षा : एक महिना कारावास.
7) दखलपात्र पोलिसासमोर घडलेला गुन्हा- कलम : बीएनएस 170 - शिक्षा : 14 दिवस न्यायालयीन कोठडी.
8) प्लाझमा/ लेझर लाईटचा वापर - कलम नागरी सुरक्षा संहिता 163 - शिक्षा : एक वर्ष कारावास, द्रव्य दंड किंवा दोन्ही.