Sangli : सांगलीत महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता ; राजकीय पक्षांची लगबग
सांगली : नगरपालिका, नगरपंचायती पाठोपाठ आता जिल्हा परिषद व त्यानंतर महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता असून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी जानेवारी २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यात मतदान शक्य असल्याचे सांगण्यात येते. महापालिकेसाठी यापूर्वी सन २०१८ मध्ये २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती. २०२३ पासून महापालिकेवर प्रशासक नियुक्त आहे.
आयुक्त सत्यम गांधी हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ लागल्या असून महापालिकेसाठी जानेवारीमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. नगरपालिका आणि नगरपंचायती कार्यक्रम राज्य निवडणुकीचा निवडणूक आयोगाकडून बुधवारी घोषित करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घ्यायच्या आहेत. त्या दृष्टीने नगरपालिके नंतर आता कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
त्याच्यानंतर लगेचच महापालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी येत्या 99 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. पालिकेच्या ७८ जागेसाठी निवडणूक होणार आहे. नगरपालिका आणि त्या पाठोपाठ येणारी जिल्हा परिषद याचा विचार करता महापालिकेसाठी जानेवारीच्या - दुसऱ्या अगर तिसऱ्या आठवड्यात - मतदान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
त्यासाठी चाळीस दिवस अगोदर म्हणजे - डिसेंबरच्या सुरुवातीला आचारसंहिता - लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. त्यादृष्टीने राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. प्रशासन पातळीवर निवडणुकीची तयारी सुरू आहे सांगली मिरज कुपवाड निवडणुकीसाठी अंदाजेत दोन कोटीचा खर्च अपेक्षित आहे या खर्चाला महापालिकेने नुकतीच मान्यता दिली आहे.
निवडणुकीच्या अगोदर आगामी दोन महिन्यात महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांचा धडाका लावण्याचे संकेत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडून देण्यात आले आहेत. महापालिकेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होण्याची शक्यता आहे दरम्यान निवडणुकीत नागरिक विकास आघाडी ही तिसरी आघाडी म्हणून उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक जोरदार होण्याची शक्यता आहे.