Pandharpur : कार्तिकी एकादशी यात्रेसाठी प्रशासन सज्ज; भाविकांसाठी स्वच्छतेला प्राधान्य
वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची पाहणी
पंढरपूर : कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा २ नोव्हें २०२५ रोजी होणार आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत लाखो वारकरी भाविक येतात. या कालावधीत वारकरी भाविकांना दर्शनरांग, पत्राशेड, वाळवंट, भक्तीसागर (६५ एकर) येथे पाणीपुरवठा, आरोग्य, सुरक्षा, स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
शहरात येणाऱ्या वारकरी-भाविकांना प्रशासनाच्यावतीने दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रयत्नशील आहेत. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वच्छतागृहाची व्यवस्था, पुरेसे पाणी उपलब्ध आहे का? स्वच्छता ठेवण्यात आली आहे का व वारकऱ्यांना स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर हात धुण्यासाठी हँड वॉशची सोय आदींची पाहणी केली.
स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यासाठी जेटींग व सक्शेन मशीन उपलब्धता करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या वाहनांना वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.