युसीसीच्या कक्षेतून आदिवासींना वगळणार !
झारखंडमध्ये अमित शाह यांचे प्रतिपादन : दर महिन्याला महिलांना 2100 रुपये देणार : वर्षात दोन सिलिंडर मोफत
वृत्तसंस्था/ रांची
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी झारखंडमध्ये भाजपचे संकल्पपत्र जारी केले आहे. संकल्पपत्र जारी केल्यावर शाह यांनी एका जाहीर सभेला संबोधित करत हेमंत सोरेन सरकारला लक्ष्य केले. झारखंडची ही निवडणूक केवळ सत्तांतर घडविणारी निवडणूक नसून झारखंडचे भविष्य सुरक्षित करणारी निवडणूक आहे. वर्तमान सरकार झारखंडची अस्मिता, रोटी, बेटी, माटीला वाचविण्यास अपयशी ठरल्याचा आरोप शाह यांनी केला आहे. राज्यात समान नागरी संहिता लागू केली जाणार आहे, तसेच याच्या कक्षेतून आदिवासींना वगळण्यात येणार असल्याची घोषणा शाह यांनी केली आहे.
आकंठ भ्रष्टाचारात बुडालेले सरकार हवे का विकासाच्या मार्गावर चालणारे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार हवे याचा निर्णय झारखंडची महान जनता घेणार आहे. घुसखोरी घडवून आणत झारखंडच्या अस्मितेला धोक्यात आणणारे सरकार सरकार हवे का पक्षीही आत शिरू शकणार नाही अशाप्रकारे सीमेची सुरक्षा करणारे भाजप सरकार हवे याचा निर्णय जनतेनेच घ्यावा असे वक्तव्य शाह यांनी केले आहे.
महिलांना सुरक्षा देण्यास सोरेन सरकार अपयशी
हेमंत सोरेन सरकारच्या काळात राज्यातील महिलांच्या दुर्दशेने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत आणि अल्पवयीन मुलींची तस्करी आणि महिलांच्या अपहरणात झारखंड दुसऱ्या क्रमांकावर राहिले. राज्यातील बलात्काराच्या प्रमाणात 42 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. आदिवासी मुलींच्या जमिनी गिळकृंत करत घुसखोर एका षडयंत्राच्या अंतर्गत काम करत आहेत. आमचे सरकार घुसखोरांना देशाबाहेर हाकलणार आहे. हेमंत सरकार महिलांना सुरक्षा पुरविण्यास अपयशी ठरले आहे. झारखंड हे भ्रष्टाचाराने पोखरलेले राज्य असल्याची टीका शाह यांनी केली आहे.
बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित
बेरोजगारी आणि पेपर लीकमुळे त्रस्त युवा आता भाजपसोबत स्वत:चे भविष्य पाहत आहे. भ्रष्टाचारामुळे गरीबांच्या वाट्याचा निधी स्वत:च्या चेल्यांना वाटणाऱ्या सोरेन सरकारच्या जागी गरीबांचे कलयाण करणारे सरकार झारखंडच्या जनतेला हवे आहे. याचमुळे भाजप स्वत:चे संकल्पपत्र सादर करत आहे. हेमंत सरकारने 5 लाख युवांना दरवर्षी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. 25 लाख नोकऱ्या सोडाच, हेमंत सोरेन यांनी केवळ 5 लाख युवांना नोकरी मिळवून दिल्याचे दाखवून द्यावे. हेमंत सरकारबद्दल युवांमध्ये आक्रोश असल्याचा दावा शाह यांनी केला आहे.
संकल्पपत्रातील महत्त्वाच्या तरतुदी
-गोगी दीदी योजनेत महिलांना दरवर्षी 2100 रुपये दर 11 तारखेला मिळणार
-500 रुपयांते सिलिंडर आणि 2 सिलिंडर दरवर्षी मोफत
-दरवर्षी 5 लाख जणांना नोकरी मिळवून देणार
-दरवर्षी पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारकांना दरमहिना 2 हजार रुपये.
-प्रत्येक गरीबाला पक्के घर बांधून देणार
-झारखंडमध्ये समान नागरी संहिता लागू करणार, आदिवासींना यातून वगळणार.
-नोकरी भरतीत पारदर्शकता आणण्यासाठी घोटाळ्यांची सीबीआय चौकशी
-आदिवासी सन्मान, अस्मितेला चालना देण्यासाठी अनुदान अन् सहाय्य
-जमशेदपूमध्ये भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारणार
-राज्यात होणारी अवैध घुसखोरी रोखण्यात येणार
घुसखोरांना बाहेर हाकलू
झारखंडमध्ये घुसखोरांना हेमंत सोरेन यांनीच आश्रय मिळवून दिला आहे. घुसखोरांमध्ये स्वत:ची मतपेढी निर्माण करण्याचा त्यांचा कुटिल हेतू आहे. या राज्यात घुसखोरांमुळे आदिवासींची संख्या घटत आहे. लोकसंख्येचे स्वरुप बदलत असताना हेमंत सोरेन सरकार दुर्लक्ष करत आहे. राज्यात भाजप सत्तेवर येताच घुसखोरांना झारखंडमधून बाहेर काढले जाणार आहे. आसाममध्ये भाजप सत्तेवर येताच घुसखोरी थांबली असल्याचा दावा शाह यांनी केला.