राजदच्या 4 लाख कार्यकर्त्यांचा डाटा लीक
प्रशांत जनसुराज पक्षाकडे पोहोचल्याचा दावा
वृत्तसंस्था/ पाटणा
राष्ट्रीय जनता दलाचा डाटा लीक झाला आहे. राजदच्या 4 लाख सक्रीय कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा डाटा लीक आहे. आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच राजदच्या नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाकडून राजदच्या अनेक सक्रीय सदस्य आणि नेत्यांना फोन केले जात असून त्यांच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत. राजद आता स्वत:च्या पातळीवर याप्रकरणी चौकशी करवित आहे.
प्रशांत किशोरसारखे लोक हे राजकारणातील व्यापारी आहेत. राष्ट्रीय जनता दल हा गरीब, युवा, शेतकरी आणि मजुरांचा पक्ष आहे. डाटा लीक झाल्याने राजदला काहीच फरक पडणार नाही. आमच्यासोबत जनता आहे. तर आमचा पक्ष मजबूत असल्याने त्याला कुणीच धक्का पोहोचवू शकत नसल्याचे राजदचे प्रवक्ते मृत्युंजर तिवारी यांनी म्हटले आहे.
बिहारची जनता तेजस्वी मॉडेलसोबत राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहे. स्वत:चे राजकीय दुकान चालावे म्हणून काही लोक वेगळे मार्ग अवलंबित आहेत. राष्ट्रीय जनता दलासमोर अशा राजकीय पक्षांची क्षमता लवकरच दिसून येणार आहे. बिहारमध्ये राजद हाच सर्वात मोठा पक्ष असल्याचे लोक जाणून असल्याचा दावा तिवारी यांनी केला.
प्रशांत किशोर आणि जनसुराजच्या विचारसरणीने प्रभावित होत लाखोंच्या संख्येत बिहारचे युवा, सर्वसामान्य लोक, शेतकरी एकजूट होत जनसुराज पक्षात सामील होत आहेत. विकसित बिहार, शिक्षित बिहार हा एकच संकल्प सर्वांच्या मनात आहे. अन्य राजकीय पक्षांमध्ये केवळ आणि केवळ घराणेशाही आहे. नेत्यानंतर त्याचा पुत्र, त्याच्यानंतर त्याचा पुत्र हेच बिहारच्या राजकीय पक्षांमध्ये दिसून येते. यामुळे राजकीय कार्यकर्ते निराश असून जनसुराजच्या विचारसरणीमुळे प्रभावित असल्याचे पक्षाचे प्रवक्ते अमित विक्रम यांनी म्हटले आहे.
जनसुराजमध्ये घराणेशाही नाही. तर योग्यतेच्या आधारावर उमेदवारी दिली जाते. या विचारांनी प्रभावित होत बिहारला एक विकसित आणि शिक्षित राज्य करण्यासाठी संकल्पित होत लोक आमच्या पक्षात येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करतो. आमचा पक्ष कुठल्याही पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांना फोडण्याचे काम करत नसल्याचे विक्रम यांनी म्हटले आहे.