अधीर रंजन चौधरींनी ‘रालोआत’ यावे
केंद्रीय मंत्री आठवले यांची ऑफर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना खुली ऑफर दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये पराभूत झाल्याने चौधरी यांना काँग्रेसकडून अपमानित केले जात आहे. काँग्रेसच्या याच भूमिकेमुळे अनेक लोक पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत. काँग्रेसमध्ये जर अपमान होत असेल तर चौधरींनी पक्षाला रामराम ठोकून रालोआत सामील व्हावे असे आठवले यांनी म्हटले आहे. यापूर्वी चौधरी यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर निशाणा साधला होता. ज्या दिवसापासून खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत, त्या दिवसापासून पक्षाच्या घटनेनुसार पक्षातील उर्वरित सर्व पदे अंतरिम झाली आहेत, माझे पद देखील अंतरिम झाल्याची टिप्पणी चौधरी यांनी केली होती.
लोकसभा निवडणुकीदरम्यान खर्गे यांनी गरज भासली तर चौधरींना पक्षाबाहेर ठेवले जाईल असे म्हटले होते. तर मी निवडणुकीदरम्यान पक्षनेत्यांसमोर माझे मत मांडले होते. परंतु खर्गे यांच्या वक्तव्यामुळे मी दुखावलो गेलो. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा निकाल काँग्रेससाठी चांगला राहिला नाही. भले मी अंतरिम प्रदेशाध्यक्ष होतो, तरीही राज्यात झालेल्या पराभवानंतर मी त्याची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती असा दावा चौधरी यांनी केला. पश्चिम बंगालमधील काँग्रेस नेत्यांची बैठक बोलाविण्याची सूचना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीकडून करण्यात आली होती. ही बैठक माझ्याच अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती. बैठकीपर्यंत मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो, परंतु बैठकीदरम्यान गुलाम अली मीर यांनी माझा उद्देश माजी प्रदेशाध्यक्ष असा केला, त्यानंतरच मी आता प्रदेशाध्यक्ष राहिलो नसल्याचे कळले असा दावा चौधरींनी केला होता.