अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालकांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक
बेळगाव : कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक आर. हितेंद्र यांनी गुरुवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गुन्हेगारी प्रकरणांचा आढावा घेतला. शनिवारीही ते बेळगावात असणार आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांना सलामी देण्यात आली. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी पुष्पगुच्छ देऊन हितेंद्र यांचे स्वागत केले. यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदींसह शहरातील एसीपी दर्जाचे अधिकारी उपस्थित होते. हितेंद्र यांनी नूतन पोलीस आयुक्त कार्यालयाचे निरीक्षण केले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बेळगाव शहर व तालुक्यातील गुन्हेगारी प्रकरणांचा आढावा घेतला. 4 डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचाही त्यांनी आढावा घेतला आहे.