For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरात जनावरे सोडणाऱ्यांना जादा दंड आकारणी

11:04 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
शहरात जनावरे सोडणाऱ्यांना जादा दंड आकारणी
Advertisement

मनपा आरोग्य स्थायी समिती बैठकीत सूचना : शहरातील उद्यानाची देखरेख करण्यात यावी

Advertisement

बेळगाव : शहरात मोकाट जनावरे सोडण्यात येऊ नयेत, असे संबंधित मालकांना अनेकवेळा सांगूनदेखील त्यांच्याकडून जनावरे पुन्हा सोडली जात आहेत. त्यामुळे याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसत असल्याने जनावर मालकांना घालण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करावी, अशी सूचना महापालिकेच्या आरोग्य स्थायी समिती बैठकीत अध्यक्ष आणि सदस्यांनी अधिकाऱ्यांना केली. मंगळवारी महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात आरोग्य स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीशैल कांबळे होते. त्याचबरोबर सत्ताधारी गटनेते अॅड. हनुमंत कोंगाली, विरोधी गटनेते मुजम्मिल डोणी, सदस्य राजू भातकांडे यांच्यासह इतर सदस्य व अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरींनी बैठकीपुढील विषय पत्रिका वाचून दाखविण्यासह मागील बैठकीतील इतिवृत्त वाचून दाखविले. यावेळी प्रामुख्याने शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न चर्चेत आला. मोकाट जनावरे मुख्य रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने रहदारीवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित जनावरांच्या मालकांवर घालण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्याची सूचना करण्यात आली. तीनवेळा दंडात्मक कारवाई करण्यात आल्यानंतर संबंधितावर पोलिसात गुन्हा दाखल करावा का? याबाबतही चर्चा झाली. मोकाट जनावरांना स्वखर्चाने पकडून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यासाठी एक जण पुढे आल्याचेही अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

सध्या शहरातील कचरा उचल करणाऱ्या वाहनांमध्ये केवळ उत्तर भागातील एकाच पेट्रोल पंपवर इंधन भरले जाते. त्यामुळे वाहनांना बराच वेळ पेट्रोल पंपवर थांबावे लागत आहे. यासाठी दक्षिण भागात देखली एखादा पेट्रोल पंप निवडण्यात यावा, अशी सूचना बैठकीत अधिकाऱ्यांना करण्यात आली. नाल्यांची सफाई करण्यासाठी दक्षिण आणि उत्तर भागासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहापूर येथील स्मशानभूमीत लाकूड आणि डिझेलची जादा दर आकारून विक्री केली जात आहे. त्यामुळे त्याठिकाणी नियुक्ती करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्याबाबत सूचना करण्यात आली. शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या वाढली असून निर्बिजीकरण करण्यासाठी जागेची निवड करण्यात आली आहे का? अशी विचारणा करण्यात आल्यानंतर के. के. कोप्प येथील यापूर्वी पाहणी केलेली जागा जिल्हाधिकाऱ्यांनी एबीसी सेंटरसाठी नको असे सांगितल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

Advertisement

त्यावर तुरमुरी येथे एबीसी सेंटर सुरू करता येईल का? अशी विचारणा केल्यानंतर तुरमुरी येथे नको? लोक तक्रार करणार असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेकवेळा सूचना करून देखील शहरात फॉगिंग केले जात नाही. सध्या 8 मशीन्स सुरू असून आठवड्यातून चारवेळा फॉगिंग केले जात असल्याचे सांगण्यात आले. काही मशीन्स बंद असल्याने फॉगिंग करण्यात आले नाही, असे उत्तरही बैठकीत देण्यात आले. ज्या कुणी फॉगिंग केले नाही त्यांना नोटीस बजावावी, अशी सूचना अध्यक्षांनी केली. त्याचबरोबर शहरातील उद्यानाची देखरेख करण्यात यावी. मोकाट जनावरे उद्यानांमध्ये शिरत आहेत. त्याचबरोबर सूचना फलक लावण्यात यावा. मागच्या बैठकीत केलेल्या सूचनांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे बैठक घेऊन काय उपयोग? असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. शहरातील धोकादायक झाडांचा सर्व्हे करून ते तातडीने हटविण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

Advertisement
Tags :

.