For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कूपनलिकांच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त खर्च

09:49 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
कूपनलिकांच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त खर्च
Advertisement

आठवडाभरात भूजल पातळी 850 फुटापर्यंत खालावली : पाणी समस्या गंभीर : स्थानिक स्वराज्य संस्थांची डोकेदुखी

Advertisement

बेळगाव : हिडकल व राकसकोप जलाशयांवर बेळगाव महानगरपालिका, गोकाक, निपाणी नगरपालिका अवलंबून आहेत. आठवडाभरात भूजल पातळी 650 वरून 850 फुटांपर्यंत खाली पोहोचली आहे. बेळगाव, गोकाक आणि निपाणी परिसरात 4 हजार 27 कूपनलिका आहेत. मात्र, भूजल पातळीत घट झाल्याने पाणी समस्या तीव्र बनू लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी कूपनलिका, नवीन पंपसेट, केबल आदींच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र पाणी समस्या कायम आहे. जिल्ह्यात 38 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागांमध्ये 8 ते 10 दिवसाआड पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. काही प्रभागांमध्ये टँकरने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी नादुरुस्त झालेल्या विहिरी आणि कूपनलिकांची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. नवीन कूपनलिका खोदाईसाठी तीन लाख, केबल दुरुस्तीसाठी 15 ते 20 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यापेक्षा दुरुस्तीवरच अधिक खर्च होऊ लागला आहे. शिवाय अपेक्षेप्रमाणे पाणीही मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कूपनलिका दुरुस्त करण्याऐवजी टँकरने पाणीपुरवठा करणेच उत्तम असल्याचे बोलले जात आहे.

टँकरने पाणीपुरवठा मागणीत वाढ

Advertisement

पाणी समस्या गंभीर बनत असल्याने टँकरची मागणी वाढू लागली आहे. परिणामी पाण्याच्या टँकरच्या दरात वाढ झाली आहे. 3 हजार लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टँकरसाठी 500 रुपये आणि 5 हजार लीटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टँकरसाठी 800 रुपये मोजावे लागत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून 8 ते 10 दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.

दुरुस्तीपेक्षा टँकरच बरा

टँकरची मागणी वाढत असल्याने काही वेळेला टँकरही उपलब्ध होत नसल्याचे दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची पाणीपुरवठा करण्यासाठी डोकेदुखी वाढणार आहे. बेळगाव महानगरपालिका आणि गोकाक, निपाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. त्यामुळे विहिरी आणि कूपनलिका दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. मात्र, दुरुस्तीसाठीच जादा खर्च होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यापेक्षा दुरुस्तीसाठीच अतिरिक्त निधी मोजावा लागत आहे. त्यामुळे पाण्याचे टँकरच उपलब्ध करावेत, अशी मागणीही होत आहे.

Advertisement
Tags :

.