सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी अतिरिक्त बसेस
बेळगाव : सौंदत्ती यल्लम्मा देवीची दर पौर्णिमेला यात्रा भरते. बेळगावमधून शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी जातात. यासाठी मध्यवर्ती बसस्थानकातून विशेष सुविधा पुरविण्यात येते. सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकातून सौंदत्ती मार्गावर धावणाऱ्या बसेससह अतिरिक्त बसेसही सोडण्यात आल्या. यामुळे भाविकांची अडचण दूर झाली असून त्यांचा प्रवास सोयीस्कर होत आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती यात्रेसाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. दर पौर्णिमेला यात्रा काळात भाविक मोठ्या संख्येने यल्लम्मा डोंगराकडे रवाना होतात. बेळगाव, खानापूर, चंदगड आदी भागातील भाविकांचा यात सहभाग असतो. भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून मध्यवर्ती बसस्थानकातून सौंदत्ती मार्गावर अतिरिक्त बसेससह नॉनस्टॉप बसेसही धावत आहेत. यामुळे भाविकांची सोय झाली आहे. बसस्थानकात सोमवार सकाळपासूनच भाविकांनी सौंदत्तीला जाण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे बसस्थानकातून जादा बसेस सोडून भाविकांची सोय करण्यात आली.