For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंचशील सूत्राला शाश्वत विकासाची जोड

06:47 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंचशील सूत्राला शाश्वत विकासाची जोड
Advertisement

मोदी यांचा शांतता सिद्धांत म्हणजे नेहरू यांच्या पंचशील तत्वाच्या पलीकडे आणखी एक पाऊल आहे. त्यांनी सांगितलेल्या पाच तत्वांच्या पुढे जाऊन मोदी यांनी सहावे तत्व सांगितले आहे. शाश्वत मानवकेंद्री विकासासाठी सक्रिय सहकार्य आणि नव्या जगाची उभारणी. यादृष्टीने विचार केल्यास, मोदी यांचा हा दौरा त्यांच्या आजवरच्या जागतिक मंचावरील धोरणामध्ये सर्वात यशस्वी ठरला आहे

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंड दौरा आटोपून दुसऱ्या दिवशी लगेच युक्रेनची राजधानी कीव येथे पाऊल ठेवले. मोदी यांच्या युक्रेन भेटीचे सार कशामध्ये असेल तर संवादाच्या राजकारणात आहे. पूर्वी भारताची भूमिका तटस्थ अलिप्ततावादाची होती. हा अलिप्ततावाद निक्रिय असायचा. नुसतेच लोकांना सल्ला देणे व मार्गदर्शन करणे या पलीकडे भारत काही उपाययोजना करू शकत नसे. नेहरू युगातील ही अलिप्तता हळूहळू इंदिरा गांधींनी बदलली आणि आता नरेंद्र मोदी यांनी आपल्या 10 वर्षात या अलिप्ततेचे ऊपांतर सक्रिय अलिप्ततेत केले आहे. ही सक्रियता त्यांनी मागील महिन्यात 6 आठवड्यापूर्वी घेतलेली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट आणि आता त्यांचा सांगावा घेऊन ते व्होलोदिमिर झेलेन्स्की यांना भेटले. हे दोन्हीही भूप्रदेश एकेकाळी सोव्हिएट रशियाचे भाग होते. पण 1991 मध्ये सोव्हिएट रशियाचे विभाजन झाल्यानंतर रशिया आणि युक्रेन ही दोन स्वतंत्र राष्ट्रे बनली. युक्रेन स्वतंत्र झाल्यानंतर त्याला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

युक्रेन हा रशियाचा शेजारी. पूर्वी सबंध जगाला गहू रशिया पुरवित असे तो युक्रेनच्या माध्यमातून. म्हणून जगातील गव्हाचे कोठार अशी युक्रेनची ख्याती आहे. परंतु गेल्या दीड वर्षातील युद्धामुळे युक्रेन आणि रशिया दोन्हीही जर्जर झाले आहेत. युद्ध युद्ध म्हणून किती करावयाचे, निष्पाप बालकांचे, नागरिकांचे किती प्राण घ्यावयाचे, त्याला कुठेतरी मर्यादा आहे. हे लक्षात घेऊन मध्यस्थाची भूमिका दुसऱ्या तिसऱ्या कोणी देशाने न घेता ती भारताने घेतली. मोदी यांची भूमिका अशी आहे की, ‘मित्र आणि भागीदार या नात्याने आम्ही या प्रदेशात शांतता आणि स्थिरता लवकर परत येण्याची आशा करतो.’ या सूत्राच्या आधारे त्यांनी दोन्ही देशांना युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे. भारत 1970 पासून रशियाचा मित्र आहे. बांग्लादेश मुक्तीच्या युद्धात रशियाने भारताची बाजू घेतली. शिवाय पाकिस्तानने भारतावर वारंवार केलेल्या आक्रमणाच्या वेळीसुद्धा रशिया भारताच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला. अशावेळी सोव्हिएट रशियाचे दोन विभाजीत तुकडे एकमेकांशी लढत असताना भारताला स्वस्थ बसून चालणार नव्हते. कारण भारत दोघांचाही समान मित्र आहे. त्यामुळे या मित्रांचे होत असलेले नुकसान आणि त्यामुळे जगाच्या शांततेला निर्माण झालेले ग्रहण सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका महत्त्वाची आहे. दोनही राष्ट्रांनी युद्ध, तणावाचा मार्ग न वापरता शांतता, मैत्री आणि सुसंवादाच्या मार्गाने सर्व प्रश्न सोडवावेत अशी भूमिका भारताने घेतली आहे. असे करताना मोदी यांनी प्रथमत: रशियाचे म्हणणे काय आहे ते समजून घेतले. व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर चर्चा केली. या चर्चेचे सार संदेश घेऊन ते युक्रेनला पोहोचले आणि युक्रेनमध्ये त्यांनी रशियाचे म्हणणे काय आहे ते सांगितले. आता त्यांनी झेलेन्स्की यांचे दुखणे काय आहे तेही समजून घेतले आहे. खरेतर, युरेशियाचा एक सलग पट्टा आहे. तेथे कुठेही अशांतता व अस्थिरता निर्माण झाली तर ती उपखंडातील विकासाला खीळ घालू शकते. हे लक्षात घेऊन, भूराजनैतिकदृष्टीने शांतता हाच खरा मार्ग असल्याचे दिसते.

Advertisement

मोदी सिद्धांताची सूत्रे:

युक्रेन युद्धाबाबत मोदींनी वास्तववादी तोडग्यांवर भर दिला आहे. चर्चा व संवादाला पर्याय नाही तोच खरा शांततेचा मार्ग होय. हे सूत्र घेऊन त्यांनी आपल्या सिद्धांताची मांडणी केली. संघर्षावर चर्चा व संवाद हाच योग्य मार्ग होय. आंतरराष्ट्रीय कायद्याचे दोन्ही बाजूंनी पालन करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच प्रादेशिक स्वायत्तता आणि एकात्मता टिकविण्यास दोघांनीही संमती दिली पाहिजे. युद्धावर तोडगा काढताना मानवकेंद्री विकास दृष्टीकोन प्राधान्याने जपावा. तणाव, युद्ध, संघर्ष या ऐवजी राजकीय स्थैर्य टिकविण्यासाठी सर्वांनी मिळून कार्य केले पाहिजे. व्यापार, आर्थिक समृद्धी, परस्पर हिताचे संरक्षण, शिक्षण आणि पुनर्रचना या युद्धोत्तर घटकांवर चर्चा करणे आवश्यक आहे.

तोडग्याचे तीन पैलू:

दोहोंचा गोषवारा काढून नरेंद्र मोदी तीन प्रकारे प्रश्न सोडविण्यासाठी तोडगा निश्चित करतील असे चित्र दिसत आहे. साधारणपणे या तीन तोडग्यांचे स्वऊप असे असणार आहे. त्यातील पहिला तोडगा असा असेल की, दोन्ही बाजूंनी तत्काळ युद्धबंदी करावी आणि जैसे थे स्थिती घ्यावी. दुसरा तोडगा असेल की, युद्धामुळे झालेले नुकसान लक्षात घेता, भविष्यकाळात अणुशक्तीचा वापर करण्याचे धोरण दोघांपैकी कोणीही स्विकारू नये. दोघांनीही युद्धासाठी रसद म्हणून आपल्या मित्रगटांचे सहकार्य घेणे थांबवावे. कारण त्यांची संरक्षण बाजारपेठ व्यापारासाठी सज्ज असली तरी त्यात नुकसान दोन्ही देशांचे आहे. तिसरा तोडगा असा असेल की, टप्प्याटप्प्याने सैन्य मागे घ्यावे आणि शांततेसाठी कटिबद्ध होऊन दोघांनी बोलणी करावीत. त्यामध्ये नाटो, अमेरिका, चीन यांची लुडबुड नसावी. युद्धबंदी करावी. तसेच रशियाच्या कारावासात असलेली लहान मुले, सैनिक यांची त्यांनी मुक्तता करावी. तसेच युक्रेननेही अशा प्रकारची काही कारवाई केली असल्यास त्यांचीही मुक्तता करावी. या तीन तोडग्याशिवाय चेर्नोबिलसारखी अणुभट्टी असेल किंवा रशियाच्या सीमेवरील ज्या आण्विक ऊर्जा निर्मितीची केंद्रे असतील त्याच्या सुरक्षिततेची हमी दोघांनीही घ्यावी. सर्व प्रकारचे प्रश्न दोघांनी शांततेने सोडवावेत. हा या तीनही तोडग्यांचा सार असणार आहे. तसेच या प्रसंगी मध्यस्थी म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ किंवा भारताने पुढाकार घ्यावा. तेव्हा युक्रेनने किंवा रशियाने आता इगो प्रॉब्लेम किंवा अहंकाराची समस्या सोडून द्यावी. अहंकाराचा भोपळा कितीही मोठा झाला तरी तो शेवटी भ्रमाचा भोपळा असतो आणि तो फुटतो. हे लक्षात घेऊन बाह्य दबावापासून मुक्त होऊन वास्तववादीदृष्टीने तोडगा काढणे महत्त्वाचे आहे यावर मोदी यांनी भर दिला. त्यामुळे मोदी यांची ही आग्रही भूमिका झेलेन्स्की यांना पटली आहे. आता ही भूमिका ते पुतीन यांना कळविण्यासाठी पुढाकार घेतील. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस गुटेरस यांची भूमिकाही मोदी यांना समांतर आहे.

स्वयंप्रज्ञा व स्वयंप्रतिभा:

जेव्हा मोदी यांनी यापूर्वी व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली तेव्हा त्यांना त्यांनी अलिंगन दिले. याचा अर्थ पाठिंबा असा नव्हता. त्याचा अर्थ असा होता की, परस्पर विश्वास आणि सौहार्दाचे वातावरण तयार करून तणाव कमी करूया. परंतु यावर झेलेन्स्की थोडे नाराज झाले होते. आता हा शांततेचा सांगावा घेऊन मोदी जेव्हा झेलेन्स्कींना भेटले आणि त्यांनाही त्यांनी अलिंगन दिले तेव्हा हे ऊबदार अलिंगन मानवतेच्या कल्याणासाठी आहे, संघर्षासाठी किंवा पाणउतारा करण्यासाठी नाही हे खुद्द झेलेन्स्की यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे हा सांगावा घेऊन मोदी तेथे पोहोचले. आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदी यांचे स्वयंभू स्थान आहे. काही राजकीय पंडितांनी मोदी जेव्हा मास्कोला पोहोचले तेव्हा ते अमेरिकेचा संदेश घेऊन तिकडे गेले आहेत असा शोध लावला होता. खरेतर, यामध्ये काहीही तथ्य नाही. असा बादरायण संबंध लावण्यात अर्थ नाही. कारण मोदी हे स्वयंप्रज्ञेचे नेते आहेत. ते स्वयंप्रज्ञेने निर्णय घेतात व स्वयंप्रतिभेने जगाच्या कल्याणाचा विचार करतात. हे त्यांनी सिद्ध केले आहे. आज जगामध्ये अमेरिकेच्या अध्यक्षापेक्षाही अधिक लोकप्रिय असलेले हे नेतृत्व आहे. मग फोर्ब्स सर्वेक्षण असो की, टाइम्स मासिकाचे सर्वेक्षण असो यामध्ये मोदी यांनी जगातील अनेक नेत्यांना मागे टाकून आपला क्रमांक पहिला ठेवला आहे. ‘जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती’ असे एक संतवचन आहे. त्यामुळे मोदी यांची भूमिका ही संतत्वाची आहे. त्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी दूत म्हणून काम केले आहे. निष्पाप लहान मुलांचे जाणारे जीव, सैन्याची होणारी हानी आणि युद्ध सामुग्रीचा होणारा क्षय तसेच शेती, उद्योग, तंत्रशिक्षण संस्था व वैद्यकीय महाविद्यालये यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि भविष्यात युक्रेनला पुन्हा उभे करण्यासाठी आणि सीमावर्ती प्रदेशातील उध्वस्त झालेले लोकांचे जीवन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भारतासारख्या देशाला पुढाकार घेणे अगत्याचे आहे.

नवा शांतता सिद्धांत:    

मोदी यांचा नवा शांतता सिद्धांत ‘ट्रीट अॅन्ड टॅकल’ या तत्वावर आधारलेला आहे. दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे. युद्धाने, संघर्षाने प्रश्न सुटत नाहीत, ते बिकट होतात. प्रश्न सोडविण्यासाठी शांततामय संवादाची आवश्यकता आहे आणि असा संवाद उभय पक्षांनी एकत्र येऊन, चर्चा करून संवादाने सोडविला पाहिजे, विकसित केला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे या भूमिकेच्या आधारे त्यांनी एकाचवेळी रशिया आणि युक्रेनच्या नेत्याबरोबर सुसंवाद साधून नवा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी यांनी केलेला युक्रेनचा झंझावाती दौरा जागतिक शांततेसाठी एक नवा मार्ग शोधणारा ठरला आहे.

- प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.