‘ऑनलाईन गेमच्या’ नादात ग्रामीण तरुण कर्जबाजारी
कोल्हापूर :
ऑनलाईन गेमींगचे पेव आता ग्रामीण भागातही पसरु लागले आहे. कमी वेळेत कमी कष्टात ज्यादा पैसे मिळविण्याच्या नादात तरुण या ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात सापडले आहेत. एकप्रकारे या गेमिंगचे त्यांना व्यसनच लागले असून पैसे मिळविण्याच्या नादात त्यांचे आर्थिक नुकसानच अधिक होत आहे. यामधून तरुण कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाईन गेमिंगने पालकांची चिंता वाढवली आहे.
ग्रामीण भागात इंटरनेटची वाढती सुविधा आणि स्वस्त डेटा प्लॅनमुळे अनेक तरुण मोबाईलच्या आहारी गेले आहेत. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून बेरोजगार तरुणांपर्यंत सर्वांनाचा पब्जी, फ्रि फायर, कॉल ऑफ ड्युटी,लुडो किंग, तीन पत्ती, रम्मी सर्कल, ड्रिम़11, एमपीएल, विन्झो, पोकेरस्टार अशा गेमिंग अॅप्सनी वेढलं आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे पाठ फिरवली आहे. अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये घट झाली आहे. शिक्षक सांगतात, “पूर्वी अभ्यासात हुशार असणारे मुलं आता सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असतात. त्यांना अभ्यासात रसच राहत नाही.“
गेमिंगमध्ये सातत्याने होण्राया पराभवामुळे आणि आर्थिक नुकसानामुळे काही तरुण मानसिक तणावाखाली येत आहेत. महाराष्ट्रातच अनेक ठिकाणी ऑनलाइन गेममुळे निराश झालेल्या तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
मुलांना मोबाईल देणं टाळणं आता अशक्य झालं आहे. मात्र त्याचा वापर किती आणि कसा होतो, यावर नियंत्रण ठेवणं हे सर्वात कठीण काम आहे. त्यामुळे अनेक पालक आणि शाळा प्रशासन सरकारकडे ऑनलाइन गेमिंगवर कठोर नियंत्रण आणणारे कायदे तयार करावेत, अशी मागणी करत आहेत. सुरुवातीला फक्त मजेसाठी खेळले जाणारे हे गेम नंतर पैसे लावून खेळल्या जाण्राया स्पर्धांमध्ये बदलतात. थोडा पैसा लावून मोठं बक्षीस जिंकण्याच्या मोहात तरुण अडकतात. पराभव झाल्यानंतर ‘पुन्हा एकदा‘ जिंकण्याच्या आशेने ते मित्रांकडून, सावकारांकडून किंवा कर्ज अॅप्समधून पैसे घेऊ लागतात. या चक्रात अडकून काही जण पूर्णत: कर्जबाजारी होतात.
- तरुणांना सावरण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
“ऑनलाइन गेमिंग हे तंबाखू किंवा दारूप्रमाणेच एक ‘नव्या युगाचं व्यसन‘ आहे. यातून बाहेर पडण्यासाठी समाजाची, पालकांची आणि शैक्षणिक संस्थांची एकत्रित जबाबदारी आहे. तऊणांनी यामधुन सावरणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यात याचे खुप तोटे सहन करावे लागणार आहेत.
-डॉ. पवन खोत, विभागप्रमूख, मानसोपचार विभाग, सीपीआर.