For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अमली पदार्थाचा अजगरी विळखा !

06:23 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमली पदार्थाचा अजगरी विळखा

विदेशातील अमली पदार्थ बनविण्याचे फॅड सध्या देशात जोम धरु लागलंय. शहरी भागात तपास यंत्रणांची घारीसारखी नजर असल्याने, तस्करांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. ग्रामीण भागातील बंद पडलेल्या कारखान्यात अथवा पडीक असलेल्या शेतीत सर्रासपणे अमली पदार्थाचे कारखाने सुरु झालेत. या अमली पदार्थाच्या अजगरी विळख्याने हळुहळू ग्रामीण भाग आवळण्यास सुऊवात केली आहे.

Advertisement

श्रीमंतीची नशा आणि मस्तीची झिंग नसा-नसात भिनल्याने, अल्पवयीन मुलांपासून ते मध्यमर्गीय व्यक्तीपर्यंत अनेकजण अमली पदार्थाच्या काळ्या जगात गटांगळ्या खात आहेत. शहरापर्यंत मर्यादीत असलेला अमली पदार्थाचा अजगरी विळखा राज्यातीलच नव्हे तर देशातील ग्रामीण भागाला देखील बसला आहे. शहरात अमली पदार्थाची तस्करी आणी त्याचा साठा हा तपास यंत्रणेच्या तत्काळ लक्षात येतो. याची भणक लागलेल्या तस्करांनी ग्रामीण भागात अमली पदार्थाचे कारखाने सुऊ केले आहेत. राज्यातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक भागात तर दिवसा ढवळ्या अमली पदार्थ बनविण्याचे कारखाने सुऊ होते. ते ही एवढे बेमालुमपणे की वर्षानुवर्षे याची कोणालाही भणक नव्हती. मात्र कानून के हात लंबे होते है.. आरोपी कितीही हुशार असला तरी एक ना एक दिवस पोलिसांच्या कचाट्यात सापडतोच. नेमके तेच तसेच झाले. सक्रीय झालेल्या अमली पदार्थ विरोधी विभागाने तत्काळ कारवाया करीत गेल्या दोन वर्षात अमली पदार्थ बनविणारे सहा कारखाने उद्धवस्त केले. तर 1 हजार कोटी रुपयांहून अधिकचे अमली पदार्थ जप्त केले.

उदाहरणच द्यायचे झाले तर ललित पाटील उदाहरण ताजे आहे. राजकीय पक्षातील नेतेच नाही तर पकडल्यानंतर ससून रुग्णालयातील

Advertisement

डॉक्टर काही पोलिसांच्या मदतीने तो रुग्णालयातून अमली पदार्थाचा काळा बाजार चालवित होता. या क्षेत्रात हातपाय पसरायला राजकीय पाठबळ राहिले होते, हे यावरुन समजते. किंबहुना राजकीय पाठबळ असल्यामुळेच त्याचे एवढे धाडस झाले होते. पश्चिम महाराष्ट्रातही अलीकडेच अमली पदार्थाबाबत मोठी कारवाई करण्यात आली होती. मुंबई क्राइम ब्रँचला याबाबत सुगावा लागला होता. त्यानुसार त्यांनी योग्यवेळी योग्य ती कारवाई करत मोठा अमली साठा उध्वस्त केला. गेल्या काही दिवसापूर्वी मुंबई क्राईम ब्रँचने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिह्यात मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना उद्धवस्त केला. कुर्ला, सांगली, गुजरातमधील सूरत या ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी 252 कोटी रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

महत्त्वाचे म्हणजे या अमली पदार्थाच्या रॅकेटमध्ये एक महिला होती. मुंबईतील लेडी माफीया अशी ओळख असलेल्या परवीन बानो शेख या महिलेला 641 ग्रॅम एमडीसह शिताफीने अटक केली. 16 फेब्रुवारीला करण्यात आलेल्या कारवाईत 12 लाख 20 हजार व 25 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. दरम्यान पोलिसांनी तिला ताब्यात घेत अधिक व सविस्तर चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी तिच्या चौकशीत तीने मीरारोड येथील व्यक्तीकडून हे एमडी घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मीरारोड येथील एमडी विक्रेता साजीद शेख उर्फ डेबस याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा कोटी किंमतीचा तीन किलो एमडी व तीन लाख 68 हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल मिळून आला. त्याच्या चौकशीत तो सुरत येथील दोघांना एमडी विकत असल्याचे समोर आले. म्हणजेच त्याचे या प्रकरणात गुजरात कनेक्शन होते, हेही नव्याने समोर आले. पोलिसांनी यानुसार पुन्हा आपल्या तपासाला अधिक गती देण्याचे निश्चित केले. त्यानुसार, पोलिसांनी सुरतला जाऊन इजाजअली अन्सारी आणि आदिल बोहरा या दोघांना अटक केली. यावेळी त्यांच्या चौकशीत ते सांगलीतून एमडी घेत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सांगलीतले इरळे गाव गाठून द्राक्षाच्या शेताच्या आड लपून गुपचूप सुरू असलेला एमडीचा कारखाना उद्धवस्त केला. त्याठिकाणी 122 किलो 500 ग्रॅम वजनाचा एमडी, एमडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करून सहाजणांना अटक केली. सांगली जिल्ह्यात एवढा मोठा कारखाना सुऊ असल्याचे वास्तव समोर आल्याने, सांगली पोलीस देखील हादऊन गेले आहे. त्यांच्या नाकाखाली सर्व सुऊ असताना मुंबई क्राईम ब्रँचने याचा पर्दाफाश केला.

यापूर्वी सोलापूरातही ड्रग्सचा गोरख धंद्याचा मुंबईच्या गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या कंपनीत ड्रग्ज निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मुंबईच्या गुन्हे शाखेचे पथकाकडून सोलापूरातल्या चिंचोली एमआयडीसी येथे छापेमारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित कंपनी सील करून, येथून जवळपास आठ किलो एमडी ड्रग्स जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत ही 16 कोटी रुपये इतकी आहे. या आधी 2016 साली या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली होती, त्यावेळीही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडण्यात आलं होतं. आता पुन्हा आठ वर्षांनी त्याच ठिकाणी छापेमारी करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. 8

ऑगस्टला साकीनाका पोलिसांना अमलीपदार्थांच्या विक्रेत्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करण्यास सुऊवात केली असता, याचे धागेदोरे नाशिक एमआयडासी परिसरात पोहचले. याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता, हा कारखाना ललित पाटीलचा लहान भाऊ भूषण पाटील चालवत होता. तो त्या ठिकाणी कच्चा माल आणत असे. सदरची जागा ही यादव नामक व्यक्तीच्या मालकीची असून ललितने ती भाडेतत्वावर घेतली होती. त्या ठिकाणी भूषण पाटील हा माल तयार करायचा. त्याला जिशान शेख (26) या कामगाराचे सहकार्य मिळत होते. हे संपूर्ण प्रकरण राज्यभरात चर्चेत होते.

29 मार्च 2022 ला अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या वरळी कक्षाने एका तस्कराला अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी गुजरातमधील भऊच जिह्यातील अंकलेश्वर तालुक्यातील पानोली येथील जीआयडीसीमध्ये असलेल्या आणखी एका कारखान्याचे नाव समोर आले होते. त्यानुसार गुन्हेशाखेच्या पथकाने 13 ऑगस्ट 2022 या कारखान्यावर छापा मारला. या कारवाईत गुन्हे शाखेने गिरीराज दीक्षित याला ताब्यात घेत 513 किलो एमडीसह एमडी तयार करण्याच्या प्रक्रियेतील 812 किलो पांढऱ्या रंगाची भुकटी आणि 397 किलो वजनाचे तपकीरी रंगाचे खडे असा कोट्यावधी ऊपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या अमलीपदार्थांची किंमत एक हजार 26 कोटी रुपये होती. याच कारवाईत गुजरातमध्ये दोन व पालघर जिह्यातील नालासोपारा येथील काखान्यांवर कारवाई करण्यात आली होती.

त्याचप्रमाणे, नोव्हेंबर 2021 मध्ये नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील चंदगड परिसरातील एका कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणातील मुख्य आरोपी राजकुमार अर्जुनराव राजहंस हा व्यवसायाने वकील असून मुंबईत कार्यरत होता. अमलीपदार्थ विरोधी पथकाने कोल्हापूरमधील फार्म हाऊसवर छापा मारला होता. तेथे एम.डी. हे अंमलीपदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने, काचेची उपकरणे, तसेच 122 ग्रॅम एम.डी. आणि 37 किलो 700 ग्रॅम एम.डी. बनविण्याचा कच्चा माल घटनास्थळाहून हस्तगत केला होता. याशिवाय 39 लिटर रसायनेही सापडली असा दोन कोटी 35 लाख ऊपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. कोंबडी व बकरी पालनासाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये हा कारखाना सुरू होता. तेथे देखभाल करणाऱ्याच्या चौकशीत फार्म हाऊसचा मालक राजकुमार अर्जुनराव राजहंस याच्यासोबत एमडी हा अमलीपदार्थ बनविण्याचे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले होते. यामुळे अमली पदार्थाच्या अजगरी विळख्याला वेळीच आळा घातला तर ठीक अन्यथा संपूर्ण देशाला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.

- अमोल राऊत

Advertisement
Tags :
×

.