For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोचीन बंदरासाठी अदानी यांची ऑफर

06:45 AM Dec 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोचीन बंदरासाठी अदानी यांची ऑफर
Advertisement

उद्योगसमूहाच्या निव्वळ लाभात 50 टक्के वाढ

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

केरळच्या कोचीन बंदरासाठी आठ सहाय्यक नौका (टगबोट्स्) बांधण्याची  450 कोटी रुपयांची ऑफर अदानी उद्योगसमूहाने दिली आहे. या नौका  2028 पर्यंत निर्माण केल्या जातील, असेही या उद्योगसमूहातील अदानी पोर्टस् या कंपनीने स्पष्ट केले आहे. बंदरात येणाऱ्या मालवाहू नौकांना योग्य स्थानी नेण्यासाठी किंवा त्यांच्या हालचालींसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या नौकांना साहाय्यक नौका किंवा टगबोट्स् असे म्हणतात, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement

अदानी उद्योगसमूह आता जलवाहतूक आणि नौकाबांधणीला प्राधान्य देत आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. कोचीन बंदराची ऑर्डर या समूहाला मिळाल्यास ती या उद्योगसमूहासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. हा उद्योगसमूह आता मेक इन इंडिया या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची योजना बनवत आहे, अशी माहिती या समूहाचे अधिकारी अश्विन गुप्ता यांनी दिली.

भारतात जागतिक दर्जाची प्रतिभा

उत्पादन क्षेत्रात काम करण्यासाठी भारतात प्रतिभावान युवकांची कमतरता नाही. त्यांच्या टॅलेंटचा व्यवस्थित उपयोग होणे आवश्यक आहे. अदानी उद्योगसमूह आपल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी या स्वदेशी प्रतिभेचाच उपयोग करणार आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. या स्वदेशी उत्पादनांची गुणवत्ता जागतिक गुणवत्तेसमान असून त्यासाठी अन्य देशांकडे पाहण्याची आवश्यकता नाही. स्वदेशी निर्मिती अधिक लाभदायक आणि रोजगारक्षम आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

निव्वळ लाभात 50 टक्के वाढ

2023 ते 2024 या आर्थिक वर्षात अदानी उद्योगसमूहाच्या करोत्तर निव्वळ लाभात तब्बल 50 टक्के वाढ झाली आहे. हा निव्वळ लाभ 8 हजार 104 कोटी रुपयांचा आहे, अशी माहितीही उद्योगसमूहाकडून देण्यात आली आहे. समूहाच्या एकंदर उलाढालीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षांच्या काळात हा उद्योगसमूह वादग्रस्ततेत सापडला होता. तथापि, आता तो काळ मागे पडला असून समूहाची वाटचाल जोमाने होत आहे. विरोधी पक्षांनी, विशेषत: काँग्रेसने या उद्योगसमूहावर आणि त्याचे प्रमुख गौदम अदानी यांना धारेवर धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या उद्योगसमूहावर कृपा आहे. त्यामुळे अदानी अल्पावधीत इतके धनवान झाले, असा आरोप काँग्रेसने अनेकवेळा केला आहे. मात्र, या राजकीय आरोपांचा कोणताही परिणाम उद्योगसमूहाच्या प्रगतीवर झालेला नाही, असे स्पष्ट होत असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :

.