अदानी पोर्टस्च्या निव्वळ नफ्यात 37 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली :
बंदर विकासाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी अदानी पोर्टस् अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन यांनी आपला तिमाही निकाल जाहीर केला असून सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यामध्ये 37 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत 2413 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कंपनीच्या पदरात पडला आहे.
दुसरीकडे सदरच्या तिमाहीत कंपनीचा कामकाजी खर्च 4434 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या आधीच्या म्हणजे 2023-24 आर्थिक वर्षात कंपनीने 1762 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. सप्टेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहीत 7372 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न कंपनीने प्राप्त केले आहे. जे मागच्या वर्षी याच अवधीत 6951 कोटी रुपये होते. मंगळवारी निकाल जाहीर होताच कंपनीचे समभाग 1.5 टक्के वाढत 1373 रुपयांवर शेअर बाजारात व्यवहार करत होते.
काय म्हणाले सीईओ
कंपनीचे पूर्णवेळ संचालक आणि सीईओ अश्वनी गुप्ता म्हणाले, कंपनीने सर्व बंदरांच्या माध्यमातून वाहतूक व्यवसायामध्ये चांगली कामगिरी नोंदवली आहे. विविध बंदरांवरची मालवाहतुकीची क्षमतादेखील वाढलेली असल्याचे त्यांनी सांगितले. व्हिजीनजॅम बंदर डिसेंबर 2024 पासून व्यावसायिक लॉजिस्टीक्सकरिता कार्यरत होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अदानी एंटरप्रायझेसचा नफा 7 पट अधिक
अदानी समूहातील आणखी एक कंपनी अदानी एंटरप्रायझेस यांचाही सप्टेंबरचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल घोषित करण्यात आला असून 1742 कोटी रुपये या तिमाहीत कंपनीने कमावले आहेत. एक वर्षाआधी हाच नफा 228 कोटी रुपये इतका होता. याचाच अर्थ यंदाच्या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यामध्ये तब्बल सातपट वाढ नोंदवली आहे. कंपनीची विक्री 15 टक्के वाढीसोबत 22608 कोटी रुपयांची झाली आहे. कंपनीच्या खर्चात 8 टक्के वाढ झाली असून तो 20787 कोटी रुपयांचा झाला आहे.