बिल गेट्स यांना मागे टाकत श्रीमंतांमध्ये अदानी चौथ्या स्थानी
संपत्ती वधारुन 9.2 लाख कोटी रुपयांवर : फोर्ब्सच्या यादीनुसार आकडेवारी सादर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अदानी समुहाचे अध्यक्ष व देशातील दिग्गज उद्योगपती अशी ओळख असणारे गौतम अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना पाठीमागे टाकत जगातील श्रीमंतांमध्ये चौथे स्थान प्राप्त केले आहे. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार अदानींची संपत्ती जवळपास 9.2 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. दुसऱया बाजूला गेट्स यांची संपत्ती 8.3 लाख कोटी रुपये राहिली असून यामध्ये दोघांच्या संपत्तीमध्ये जवळपास 11 अब्ज डॉलरचे अंतर राहिले आहे.
आशियातीलही सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले अदानी
चालू वर्षात 4 एप्रिल रोजी अदानी यांनी 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये समावेश केला आहे. तसेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्त म्हणूनही त्यांची नेंद करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी फोर्ब्सच्या यादीमध्ये 10 व्या स्थानी राहिले आहेत.
एप्रिल 2021 मधील अदानींची संपत्ती
अदानी यांची 4 एप्रिल रोजी सेंटीबिलियनेर्स क्लबमध्ये समावेश झाला होता. 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिकची नेटवर्थ असणाऱया व्यक्तींना सेंटीबिलिनेयर असे म्हटले जाते. यामध्ये 1 वर्षाच्या अगोदर एप्रिल 2021 मध्ये अदानी यांची एकूण संपत्ती 57 अब्ज डॉलर राहिली असल्याची नोंद करण्यात आली आहे.
अदानी समूहाचे समभाग तेजीमध्ये
अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग मागील दोन वर्षांमध्ये चांगली कामगिरी करत असल्याचे दिसून येत आहे. अदानी समूहाच्या काही समभागांनी दोन वर्षात जवळपास 600 टक्क्यांपेक्षा अधिकची वाढ नोंदवली आहे.
जगातील पहिले दहा श्रीमंत व्यक्ती
- रँक नाव एकूण संपत्ती
- 1 एलॉन मस्क. 18.8 लाख कोटी रुपये
- 2 बर्नार्ड अर्नाल्ट 12.4 लाख कोटी रुपये
- 3 जेफ बेजॉस.. 11.8 लाख कोटी रुपये
- 4 गौतम अदानी 9.2 लाख कोटी रुपये
- 5 बिल गेट्स... 8.3 लाख कोटी रुपये
- 6 लॅरी एलिसन 7.97 लाख कोटी रुपये
- 7 वॉरन बफे.... 7.95 लाख कोटी रुपये
- 8 लॅरी पेज...... 7.86 लाख कोटी रुपये
- 9 सर्गेई ब्रिन.... 7.55 लाख कोटी रुपये
- 10 मुकेश अंबानी 7.18 लाख कोटी रुपये