अदानी समूह बिहारमध्ये 20 हजार कोटींची करणार गुंतवणूक
अल्ट्रा-सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्पाची उभारणी करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने शुक्रवारी बिहारमध्ये 20,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह अत्याधुनिक ऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. याशिवाय, समूह राज्यात सिमेंट, अन्न प्रक्रिया आणि लॉजिस्टिक व्यवसायाचा विस्तार करत आहे.
अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे संचालक प्रणव अदानी यांनी ‘बिहार बिझनेस कनेक्ट’ 2024 या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत बोलताना सांगितले की, समूहाने यापूर्वीच बिहारमध्ये लॉजिस्टिक, गॅस वितरण आणि कृषी लॉजिस्टिक या तीन क्षेत्रात सुमारे 850 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आम्ही आता या क्षेत्रांमध्ये आणखी 2,300 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत.
या गुंतवणुकीमुळे आमची गोदाम आणि देखभाल क्षमता वाढेल आणि इलेक्ट्रिक वाहने, सिटी गॅस वितरण आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात आमची उपस्थिती वाढेल. यामुळे 27,000 अतिरिक्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. अदानी समूह बिहारमधील गती शक्ती रेल्वे टर्मिनल, (इनलँड कंटेनर डेपो) आणि इंडस्ट्रियल वेअरहाऊसिंग पार्क यांसारख्या धोरणात्मक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.
ते म्हणाले, आम्ही स्मार्ट मीटर निर्मितीमध्येही गुंतवणूक करत आहोत. सिवान, गोपालगंज, वैशाली, सारण आणि समस्तीपूर या पाच शहरांमध्ये वीज वापराचे स्वयंचलित निरीक्षण करण्यासाठी 28 लाखांहून अधिक स्मार्ट मीटरचे उत्पादन आणि स्थापनेसाठी 2,100 कोटीची गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.