अदानी समूह उतरणार टॅक्सी सेवेत
वृत्तसंस्था/ मुंबई
बाजार भांडवलाच्या बाबतीमध्ये भारतातील तिसऱ्या नंबरची समूह कंपनी अदानी आता टॅक्सी सेवेत उतरण्याचा विचार करते आहे. सदरच्या टॅक्सी सेवेसाठी उबर टेक्नॉलॉजी या कंपनीशी धोरणात्मक भागीदारी करण्यासंदर्भात कंपनी विचार करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
अदानी समूह या भागीदारी अंतर्गत उबर टेक्नॉलॉजीच्या मदतीने इलेक्ट्रीक पॅसेंजर कारचे सादरीकरण करणार असल्याची माहिती आहे. या माध्यमातून अदानी समूह आपल्या स्वत:च्या ‘अदानी वन’ या अॅपला मजबूतता प्रदान करणार आहे. उबरची सेवा अदानी समूह आपल्या अॅप अंतर्गत देण्यासाठी ही योजना बनवत आहे. अदानी वनचे अॅप 2022 मध्ये समूहाने लाँच केले होते. 24 फेब्रुवारी रोजी अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी आणि उबरचे सीईओ यांच्यामध्ये बैठक झाली होती. सदरच्या बैठकीमध्ये वरीलप्रमाणे भागीदारीसंदर्भात चर्चा झाली होती.
उबरसोबत उज्ज्वल भविष्याचे संकेत -गौतम अदानी
उबर इंडियासोबत झालेल्या बैठकीमध्ये भागीदारीचा निर्णय घेण्यात आला असून समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी सदरच्या भागीदारीबाबत आपण उत्साही आहोत आणि भविष्यकाळदेखील उज्वल असणार असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स यावर त्यांनी आपले मत मांडले आहे. भारतामध्ये उबरचा विस्तार पाहून आपण आनंदित झालेलो आहोत. त्यामुळे त्यांच्यासोबत भागीदारी करणे समूहासाठी आगामी काळासाठी महत्त्वाचे असणार आहे.