अदानी समूह आयटीडी सिमेंटेशनमध्ये घेणार 46 टक्के हिस्सेदारी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अदानी समूह आयटीडी सिमेंटेशन इंडियामध्ये 46 टक्के इतकी हिस्सेदारी खरेदी करण्याची तयारी करत आहे. सदरच्या हिस्सेदारीबाबतच्या बातमीनंतर शुक्रवारी आयटीडी सिमेंटेशन इंडियाचे समभाग 14 टक्के इतके वाढल्याचे पाहायला मिळाले. कंपनीचे समभाग तेजीसह इंट्रा डेदरम्यान 539 रुपयांवर पोहोचले होते. एवढंच नाही तर सकाळी 11 वाजता कंपनीचे समभाग 17 टक्के इतके वाढत 554 रुपयांवर पोहचले होते. याचवेळी अदानी एंटरप्रायझेसचे समभागही 1.34 टक्के वाढत 2982 रुपयांवर व्यवहार करत होते.
कितीला होणार खरेदी
आयटीडी सिमेंटेशन ही अभियांत्रिकी व बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी आहे. अदानी समूह आयटीडी सिमेंटेशनमध्ये 46.64 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची योजना बनवत आहे. सध्याच्या बाजार मूल्याच्या तुलनेनुसार पाहता हिस्सेदारीचा खरेदी व्यवहार हा 5888 कोटी रुपयांना होणार असल्याचे सांगितले जात आहे. या नव्या हिस्सेदारीबाबत मागच्या आठवड्यात दोन्ही कंपन्यांमध्ये बोलणी झाल्याचे बोलले जात आहे. अदानी समुहाला या हिस्सेदारी खरेदीचा भविष्यात आपल्या व्यवसायासाठी फायदा होणार आहे.