अदानी समूह: 9 कंपन्यांचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार हजार अंकानी वाढत सुरु झाला होता. यामध्ये अदानी समूहातील कंपन्यांचा वाटादेखील लक्षणीय ठरला होता. अदानी समूहातील 10 पैकी 9 कंपन्यांचे समभाग तेजीत कार्यरत होते. यातही अदानी एनर्जी सोल्युशनचा समभाग सर्वाधिक 7 टक्के वाढला होता. त्यामुळे अमेरिकेकडून करण्यात आलेल्या आरोपानंतर घसरणीत राहिलेले कंपन्यांचे समभाग पुन्हा सोमवारी वरच्या दिशेने सरकताना दिसून आले. यायोगे कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्यामध्ये काहीसे यश मिळवले आहे.
अदानी समूहातील अदानी ग्रीन एनर्जी 6.42 टक्के, अदानी टोटल गॅस 5.33 टक्के, अदानी पोर्टस 4.64 टक्के आणि अदानी पॉवरचे समभाग 4.17 टक्के इतके तेजीत होते. सोबतच अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 4 टक्के, अदानी विल्मरचे समभाग 3.23 टक्के तसेच एसीसी 3 टक्के व अंबुजा सिमेंट 2.71 टक्के तेजीसह कार्यरत होते. मात्र याविरुद्ध एनडीटीव्हीचे समभाग मात्र 2 टक्के घसरणीत होते.
आरोपाचा दबाव निवळला
सोमवारी सेन्सेक्स सुरुवातीच्या सत्रामध्ये 1333 अंकांनी वाढत 80 हजार 447 च्या स्तरावर तर निफ्टी 438 अंकाच्या वाढीसोबत 24345 च्या स्तरावर कार्यरत होता. अदानी समूहांवर अमेरिकेने गेल्या काही दिवसांपूर्वी लाचखोरीसंदर्भातील आरोप केले होते. त्यानंतर शेअर बाजारात यांच्या समभागात घसरण पहायला मिळाली होती. पण सोमवारी दबाव झुगारत कंपन्यांचे समभाग पुन्हा तेजीकडे झेपावताना दिसले.