अदानी एनर्जीच्या नफ्यात वाढ
नवी दिल्ली : अदानी समूहातील कंपनी अदानी एनर्जी यांनी आपल्या जूनअखेरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून एकत्रित निव्वळ नफ्यात दमदार 95 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. कंपनीने गुरुवारी निकालाची घोषणा केली. आर्थिक वर्ष 2025 मधील पहिल्या तिमाहीत कंपनीने 629 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. एक वर्षाआधी याच अवधीत कंपनीने 323 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. याचदरम्यान कंपनीने याच तिमाहीत 22 टक्के इतक्या वाढीसह 3122 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीने 2550 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला होता. महसुल, नफा यात कंपनीची मजबूत स्थिती राहिली असून ऊर्जा क्षेत्रातील व्यवसायही यावर्षी चांगलाच बहरला आहे. 2030 पर्यंत 50 जीडब्ल्यू इतकी क्षमता ऊर्जा निर्मितीत साध्य करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न असणार आहेत. ऊर्जा प्रकल्पांची क्षमता यंदा जवळपास 31 टक्के इतकी वाढली आहे. 10934 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती सध्याला केली जात आहे. यात वाटा उचलला आहे तो खावडाने जिथे 2000 मेगावॅटचे सौर ऊर्जा उत्पादन घेतले जात आहे.