कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मातीतला अभिनेता

06:58 AM Nov 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या एक्झिटने एका लोभस आणि भारदस्त पर्वाचाच अस्त झाला आहे. भारतीय सिनेसृष्टीवर अनेक प्रतिभावान व श्रेष्ठतम अभिनेत्यांनी आपल्या अभिनयाची नाममुद्रा उमटवली. त्यामध्ये धर्मेंद्र यांचे स्थानही तितकेच वरचे म्हणावे लागेल. धर्मेंद्र यांचा जन्म शेतीमातीशी घट्ट जोडलेल्या गेलेल्या पंजाबातील एका सामान्य कुटुंबातला. त्यांचे वडील गणिताचे शिक्षक होते. स्वाभाविकच घरातील वातावरणही शैक्षणिक स्वरुपाचे असल्याने चित्रपटाच्या दुनियेत रमण्याचा प्रश्नच नव्हता. अशा स्थितीतही धर्मेंद्र दिलीपकुमारचा ‘शहीद’ हा चित्रपट चोरून पाहतात आणि त्यातूनच त्यांच्या अभिनय कारकिर्दीचे बीजारोपण होते, हा प्रवास विलक्षणच ठरावा. दिलीपकुमार यांची त्या काळात अभिनयसम्राट अशीच ओळख होती. त्यांच्या अभिनयाने धर्मेंद्र यांच्यावर गारूड घातले. पुढे फिल्मफेअर मासिकाच्या टॅलेंट हंट स्पर्धेतील संधी व यशामुळे धर्मेंद्र यांचा रस्ता मोकळा झाला व मुंबई चित्रनगरीची वाट धरत त्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला. अर्थात धर्मेंद्र यांनाही मोठे स्ट्रगल करावे लागले. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ हा त्यांचा पहिलावहिला चित्रपट. 1960 ला हा चित्रपट आला कधी आणि गेला कधी, हे कुणाला कळलेही नाही. हा चित्रपट आपटला असला, तरी धर्मेंद्रचा चेहरा सर्वांच्या लक्षात राहिला. नंतरच्या ‘शोला और शबनम’ या चित्रपटाला मात्र चांगले यश मिळाले. त्यानंतर बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’ या चित्रपटाने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. आयी मिलन की बेला, अनपढ, हकीकत या चित्रपटातही धर्मेंद्र यांनी आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले. तथापि ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘अनुपमा’ व ‘सत्यकाम’मधील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. ‘अनुपमा’मधील संवेदनशील लेखक, तर ‘सत्यकाम’मधील सत्यवादी तरुणाची भूमिका धर्मेंद्रने ताकदीने पेश केली. पुरुषाने लाजायचे नसते, हा तसा आपल्याकडचा अलिखित नियम. पण, या धारणांच्या पलीकडे जाऊन धर्मेंद्रचे लोभसवाणे हसणे, लाजणे सर्वांना खुणावत राहिले. लाजल्यावर पुरुष किती मोहक आणि सुंदर दिसू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धर्मेंद्र. देखणा चेहरा, त्यावरचे मधाळ स्मितहास्य आणि तितक्याच भावूक भूमिका या काँबिनेशनमुळे रोमँटिक हिरो म्हणून सिनेरसिकांनी धर्मेंद्रला मोठी पसंती दिली. 60 ते 70 च्या आसपास असे अनेक हळूवार चित्रपट धर्मेंद्रने केले. त्यामुळे ‘चॉकलेट बॉय’ अशी त्यांची प्रतिमा तयारी झाली. ‘ब्लॅकमेल’मधील ‘पल पल दिल के पास’ हे धर्मेंद्र व राखीवर चित्रित झालेले गीत आणि त्यातील या लोभस नायकाच्या चेहऱ्यावरील विविध छटा आजही सर्वांना आनंद देऊन जातात. नंतरच्या काळात अनेक

Advertisement

अॅक्शनपटांतून त्यांनी काम केले. बलदंड शरीरयष्टी, डोळ्यामध्ये आग आणि ‘कुत्ते, कमिने मैं तेरा खून पी जाऊंगा’ हा दात, ओठ चावून म्हटलेला संवाद, ही तर धर्मेंद्र यांची ओळखच बनली. त्या काळात धर्मेंद्रसारखे भारदस्त व्यक्तिमत्त्व फार कुणाचे नव्हते. त्यामुळे दिग्दर्शकांनी धर्मेंद्र यांच्या देहयष्टीचा चित्रपटात पुरेपूर उपयोग करून घेतला आणि त्यातूनच हिमॅन ही उपाधी या ताकदवान अभिनेत्याला मिळाली. रेश्मा और शेरा, यादों की बारात, जीवन मृत्यू, धरम वीर, मेरा गाँव मेरा देश, राम बलराम, शोले यांसारख्या चित्रपटांनी धर्मेंद्र यांची पोलादी प्रतिमा तयार झाली. अर्थात विनोदी अभिनेता म्हणूनही त्यांनी छाप उमटवली. चुपके चुपके, सीता गीता यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या विनोदी छटा अनुभवायला मिळाल्या. ‘शोले’ हा बॉलीवूडमधला अजरामर चित्रपट. यातील अमिताभच्या अभिनयाने त्यांना सर्वोच्च स्थानावर नेले. किंबहुना, धर्मेंद्रने एकच वेगळी अॅक्शन, कॉमेडी आणि

Advertisement

ट्रॅजेडी असा त्रिवणीसंगम साधत जयबरोबरच वीरूही अमर केला. अमिताभ आणि धर्मेद्र तसेच जितेंद्र आणि धर्मेंद्र यांच्यातील केमिस्ट्रीही भारी होती. जितेंद्रसोबतचे द बर्निंग ट्रेन, धरम वीर हे चित्रपट आजही आठवतात. ड्रिम गर्ल व नंतरची पत्नी हेमा मालिनीसोबतची धर्मेंद्रची जोडी बॉलीवूडमध्ये चांगलीच गाजली. खरे तर राजेश खन्ना आणि अमिताभ यांच्यातील द्वंद्वाचा काळ हा अतिशय धामधूमीचा होता. जितेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न खन्ना, शशी कपूर हे सर्व समकालीन कलाकार त्या वेळी करिअरसाठी धडपडत होते. किंबहुना, या सगळ्या धबडग्यातही धर्मेंद्र यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. असे असले तरी उत्तरार्धात त्यांनी काही देमार चित्रपटही केले. ‘बॉक्स ऑफिस’वर हे चित्रपट चालले नसले, तरी धर्मेंद्र यांच्यावर प्रेम असलेला चाहतावर्ग कायम टिकून राहिला. धर्मेंद्र यांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्या म्हणजे चित्रपटाच्या मायानगरीत मोठे यश मिळाल्यानंतरही धर्मेंद्र यांनी मातीशी असलेले आपले नाते कधी तुटू दिले नाही. शेती ही त्यांची केवळ आवड नव्हती, तर जगण्याचा श्वास होता. पुणे जिल्ह्यातील मावळातील जमिनीतही पीकपाणी काढण्यासाठी हा मातीतला अभिनेता यायचा आणि शेतीमध्ये रमून जायचा. धर्मेंद्र हे सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते होते. विविध प्रयोग शेतीत ते करत असत. काही काळ राजकारणातही ते सक्रिय होते. बिकानेरमधून खासदार म्हणून ते निवडून आले होते. परंतु, हळव्या मनाचा हा अभिनेता नेतेपदाच्या खुर्चीत फार काही रमला नाही. उर्दू शायरी, काव्य, यावर ते प्रेम करत. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 300 वर चित्रपट केले. यामध्ये वेगवेगळ्या स्वरुपाच्या भूमिका त्यांनी केल्या. परंतु,

अॅक्शनपटांमुळे हिमॅनचा शिक्का त्यांच्यावर बसला तो बसलाच. यामध्ये कुठेतरी लाजरा, बुजरा, स्मितवदनी, मोहक, लोभस, राजस धर्मेंद्र झाकोळून गेला, असे वाटते. मुख्य म्हणजे चित्रपट समीक्षकांनीही धर्मेंद्रच्या विविध पदरी अभिनयाची म्हणावी तशी दखल घेतली नाही. अर्थात असे असले, तरी धर्मेंद्र यांना चाहत्यांकडून अपार प्रेम मिळाले. म्हणूनच त्यांच्या एक्झिटनंतरही ‘पल पल दिल के पास...’हीच चाहत्यांची भावना आहे. मातीतला अभिनेता धर्मेंद्र यांना भावपूर्ण आदरांजली.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article