अभिनेता अतुल परचुरे यांचे निधन
प्रतिनिधी/ मुंबई
मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट आणि हिंदी मालिकांमधून अभिनय साकारणारे अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते कर्करोगाशी लढा देत होते. त्यावर त्यांनी मात केली होती. मात्र दोन आठवड्यापूर्वी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर मात्र त्यांना घरी सोडण्यात आले. आज अतुल यांचे एच. एन. रिलांयन्स रुग्णालयात झालेल्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला असून अनेकजण समाजमाध्यमातून श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी लढा दिला होता. कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा काम करण्यास सुऊवात केली होती.अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. त्यांनी साकारलेल्या पुलंच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून, न भऊन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. अतुल परचुरे यांनी अनेक अभिनेते, दिग्दर्शक, कलाकारांसह काम केलं. वासूची सासु, प्रियतमा, तऊण तुर्क म्हातारे अर्क या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केलं. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. याशिवाय ‘जागो मोहन प्यारे‘ मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं.
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट :मुख्यमंत्री
रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपास्नूच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. तऊण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले.मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भऊन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो.