विशाल पाटील यांनी बंड करावे यासाठी कार्यकर्ते आग्रही! नेते म्हणतात जरा सबुरीने घ्या : काँग्रेसच्या नेत्यांची आज बैठक
बैठकीत जोरदार चर्चा होणार : विश्वजीत कदम यांचेही मौन : विशाल पाटील नॉट रिचेबल
सांगली प्रतिनिधी
महाविकास आघाडीने सांगलीची जागा शिवसेनेला दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा या मतदार संघावरील दावा पूर्णपणे संपलेला आहे. त्यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी आघाडीविरूध्द बंड करावे, अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी याविषयावर मौन बाळगले आहे. तर विशाल पाटील हे नॉट रिचेबल आहेत. बुधवारी दुपारी काँग्रेस कमिटी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत यावर चर्चा होवून विशाल पाटील हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्याविरूध्द बंड करणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.
बैठक झाल्यावरच आम्ही निर्णय जाहीर करू : जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत
सांगली हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. पण या प्रयत्नाला यश मिळाले नाही ही वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा एक मुख्य पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस नेते आम्हाला काय आदेश देतात त्यावर आम्ही काही निर्णय घेणार आहे. पण जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि नेत्यांच्या मनात या निवडणुकीबाबत व उमेदवारीबाबत काय भूमिका आहे ती समजून घेण्यासाठी बुधवारी दुपारी अकराच्या सुमारास सांगली काँग्रेस कमिटी येथे प्रथम नेत्यांची त्यानंतर पदाधिकाऱ्यांची आणि मग कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक होईल या बैठकीनंतरच आम्ही यावर अधिकृत भूमिका जाहिर करू, असे काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी स्पष्ट केले.
विक्रम सावंत म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मत विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी असे आहे. पण प्रत्येक गोष्ट करताना आम्हाला कार्यकर्त्याबरोबरच नेत्यांचे मतही जाणून घेणे गरजेचे ठरते तसेच प्रदेश कार्यकारिणी आणि राष्ट्रीय नेत्यांनाही या भावना समजून सांगण्याची गरज पडते त्यामुळे तातडीने असे बंडाची भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे याबाबत तात्काळ काहीही निर्णय होणार नाही जो निर्णय होईल तो काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या साक्षीने आणि एकमताने होईल आणि तो निर्णय बुधवारी केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्व पदाधिकारी आणि नेत्यांना चर्चेसाठी बोलविले
दरम्यान या बैठकीबाबत काँग्रेसच्या काही ज्येष्ठ मंडळींनी सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे या विरोधात आवाज उठविण्याची निश्चित गरज आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना यातून मार्ग काढण्यासाठी बुधवारी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला माजी मंत्री विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. शिकंदर जमादार यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच त्यानंतर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर कार्यकर्त्यांची बैठक होवून त्यातून निर्णय घेण्यात येणार आहे.
विश्वजीत कदम यांचे मौन तर विशाल पाटील नॉटरिचेबल
दरम्यान सांगलीच्या जागेसाठी आक्रमक भूमिका मांडणारे आणि दिल्ली, मुंबई, नागपूर या सर्व ठिकाणी जावून ही जागा खेचून आणण्यासाठी प्रयत्न करणारे जिल्हा काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी या विषयावर अद्यापपर्यत मौन बाळगले आहे. इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते ही नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे सांगलीत विशाल पाटील बंड करणार का याबाबत अद्यापही कोणताही निर्णय झाला नाही.
कार्यकर्ते मात्र विशाल दादा लढाच असे म्हणत आहेत
दरम्यान मुंबई येथे महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर सांगलीची जागा शिवसेनेला मिळाल्यावर सांगलीत काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी विशाल दादा यांनी जनतेच्या कोर्टात जावे, त्यासाठी निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे. तसे अनेक स्टेटसही त्यांनी ठेवले आहेत. त्यामुळे आता विशाल पाटील नेत्यांचे ऐकणार का कार्यकर्त्यांचे हे दोन दिवसात स्पष्ट होईल.