शाहूपुरी पोलिसांची २७ डॉल्बीवर कारवाई
सातारा :
सातारा शहरातील शाहूपुरी पोलिसांनी गणेशोत्सव काळात ध्वनी मर्यादा मोडणाऱ्या तब्बल २७ डीजे डॉल्बीवर कारवाई करून नागरिकांच्या आरोग्य व शांतीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. या कारवाईबद्दल ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने पोलिसांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
- ज्येष्ठांचा पुढाकार डॉल्बीमुक्त उत्सवाची मोहीम
गणेशोत्सव काळात ज्येष्ठ नागरिक संघासह १८ संघटना पुढे आल्या आणि "डॉल्बी मुक्त उत्सव" ही मोहीम राबवली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन आवाज प्रदूषणाविरोधात ठोस पावले उचलण्याची मागणी केली. अगदी मुसळधार पावसात मोर्चा काढून समाजात जागृती घडवून आणली. घराघरात डॉल्बीच्या दुष्परिणामांबद्दल चर्चा केली. स्थानिक नेत्यांना ध्वनीप्रदूषणाविरोधात जबाबदारीची जाणीव करून दिली. या मोहिमेला दैनिक तरुण भारत पाठबळ दिले.
- पोलिसांची २७ डॉल्बीवर कारवाई
सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या ध्वनी मयदिपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या २७ डॉल्बी मालकांवर शाहूपुरी पोलिसांनी बडगा उगारला. या डॉल्बीवरील प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी पाठविण्यात येत असून, लवकरच न्यायालयीन आदेशांनुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
यावेळी जनार्दन घाडगे गुरुजी, प्रकाश खटावकर आणि डॉ. हिरवे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
- नागरिकांचा प्रतिसाद पारंपरिक वाद्यांचा गजर
या उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले. काही मंडळांनी डॉल्बी रद्द करून डोल-ताशा, बँड-बेंजो यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढल्या. तथापि काही मंडळांनी हट्टाने डॉल्बी वाजवली आणि ध्वनी मर्यादा भंग केल्या.
- ज्येष्ठांचा सन्मान सोहळा
या यशस्वी कारवाईबद्दल ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या प्रतिनिधींनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलिसांचा सत्कार केला. "पारंपरिक उत्सवांमध्ये सर्व नागरिक आनंद घेऊ शकले पाहिजेत, त्याचवेळी आवाजामुळे कुणाला त्रास होऊ नये, हीच खरी सुरक्षितता आहे, असे विजय देशपांडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय देशपांडे यांनी सांगितले.