कॅन्टोन्मेंट हद्दीतील अनधिकृत फलकांवर कारवाई
महसूल वाढीसाठी कॅन्टोन्मेंटची मोहीम
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डअंतगृ अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डींग्ज लावण्यात आले आहेत. हे होर्डींग्ज कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांनी सोमवारी हटविले. गोगटे सर्कल येथील अनेक अनधिकृत फलक, तसेच होर्डींग्ज कर्मचाऱ्यांनी हटविल्याने हा परिसर काहीसा मोकळा झाला आहे.
धर्मवीर संभाजी चौक, गोगटे सर्कल, रेल्वेस्टेशन रोड या परिसरात अनेक ठिकाणी होर्डींग्ज लावण्यात आले आहेत. काही होर्डींग्ज लावण्यासाठी कॅन्टोन्मेंटकडून पूर्वपरवानगी घेण्यात आली आहे. परंतु, अनेक ठिकाणी कार्यक्रम, उत्सव यांचे फलक लावण्यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. परवानगी नसलेले फलक हटविण्याची मोहीम कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांकडून सोमवारी सुरू होती.
परवानगी घेऊनच फलक लावण्याची सूचना
गोगटे सर्कल येथील बरेचसे फलक हटविण्यात आले. ज्या फलकांची नोंदणी कॅन्टोन्मेंटकडे नाही, असे फलक हटविण्यात आले. अनधिकृत फलकांमुळे कॅन्टोन्मेंटचा महसूल बुडत असल्याने ही कारवाई करण्यात आली. बेळगाव मनपा पाठोपाठ आता कॅन्टोन्मेंटनेही अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परवानगी घेऊनच फलक लावण्याची सूचना कॅन्टोन्मेंट बोर्डकडून करण्यात आली आहे.