हिंदवाडीतील तीन पान टपरींवर कारवाई
बेकायदा स्मोकिंग झोन उपलब्ध करून दिल्याचा ठपका : प्लास्टिक ग्लासही मनपाकडून जप्त
बेळगाव : पान टपरी आवारात बेकायदा स्मोकिंग झोन तयार करून नागरिकांना सिगारेट पिण्यास मुभा देणाऱ्या तीन पान टपरींवर मनपाच्या आरोग्य विभागाने कारवाई केली आहे. मंगळवारी आर. के. मार्ग येथे ही कारवाई करण्यात आली असून तीन टपरींना प्रत्येकी 5000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीररित्या स्मोकिंग झोन बनविलेल्या पान टपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत. महानगरपालिकेच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करायचा असल्यास संबंधितांनी महानगरपालिकेकडून व्यापार परवाना घेणे गरजेचे आहे.
मात्र बहुतांश जणांकडून अद्यापही व्यापार परवाने घेण्यात आलेले नाहीत. बेकायदेशीररित्या व्यवसाय चालविण्यात आल्याने व्यापार परवाना माध्यमातून महापालिकेला मिळणारे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाकडून व्यापार परवाना सक्ती केली जात आहे. त्यातच यापूर्वी मनपा आयुक्त शुभा बी. यांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यासाठी स्वतंत्र व्यापार परवाना घेणे जरुरीचे असल्याचा आदेश जारी केला आहे. 30 मार्चपर्यंत जे व्यावसायिक तंबाखूजन्य विक्रीसाठी आवश्यक परवाना घेत नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा दिला होता.
मात्र अद्यापही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे स्वतंत्र परवाना घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. पान टपरी चालवायची असली तरी मनपाचा व्यापार परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र आर. के. मार्ग, हिंदवाडी येथील तीन पान टपरी चालकांनी मनपाचा व्यापार परवाना तर नाहीच, उलट नागरिकांना सिगारेट पिण्यास स्मोकिंग झोन उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मंगळवारी मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने तीन पान टपरींमधील सिगारेट जप्त करण्यासह प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे पान टपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत.
प्लास्टिक ग्लासची विक्री...
सिंगल यूज प्लास्टिकच्या विक्री आणि वापरावर बंदी असतानादेखील शहर व उपनगरात अद्यापही खुलेआम प्लास्टिकची विक्री सुरूच आहे. किराणा, तसेच पान टपरीमध्ये प्लास्टिक ग्लास विक्री केले जात आहेत. मंगळवारी मनपाच्या पथकाने तीन पान टपरींमधील सिगारेट जप्त करण्यासह विक्रीसाठी ठेवण्यात आलेले प्लास्टिक ग्लासही जप्त केले.