Sangli : सांगलीत लाच घेताना म्हाडा शिपायावर कारवाई !
म्हाडा कार्यालयातील शिपायावर लाच मागणीप्रकरणी कारवाई
सांगली : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, उपविभागीय कार्यालय सांगलीकडे कार्यरत असणाऱ्या शिपायाने एक हजाराची लाच मागितल्याप्रकरणी त्याच्याविरूध्द कारवाई केली आहे. ही कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. कारवाई झालेल्या शिपायाचे नाव विजय यशवंत गंगाधर बय ४८, रा. मु. पो. साखराळे, ता. वाळवा, असे आहे. त्याच्याविरूध्द संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, म्हाडामध्ये घर घेतलेल्या एकाला त्याच्या घरासाठी बीज कनेक्शन आणि पाणी कनेक्शन नावावर करण्यासाठी या विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे होते. हे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी या शिपायाने एक हजाराची लाच या तक्रारदारांकडे मागितली. त्यानंतर या तक्रारदारांने याची तक्रार सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या विभागाकडून या तक्रारीची शहानिशा करण्यात आली.
यामध्ये सत्यता आढळून आल्यावर तात्काळ या शिपायाविरूध्द लाच मागणीचा संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार, पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, किशोर खाडे, अजित पाटील, प्रीतम चौगुले, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, उमेश जाधव, ऋषीकेश बडणीकर, सलीम मकानदार, यांनी केली.