For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेच्या दबावामुळे टाळली कारवाई

06:10 AM Oct 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेच्या दबावामुळे टाळली कारवाई
Advertisement

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पी. चिदंबरम यांची स्पष्ट कबुली, भाजपचा काँग्रेसवर तीव्र प्रहार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या भीषण आणि क्रूर दहशतवादी हल्ल्यासंदर्भात माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी महत्वाची कबुली दिली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात वादळ उठले आहे. तो हल्ला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केला होता. तसेच त्याचे सूत्रसंचालन पाकिस्तानातूनच झाले होते. तो हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानवर कठोर सैनिकी कारवाई करावी, असे मी ठरविले होते. त्यावेळचे नेते मनमोहनसिंग यांच्याशी माझी चर्चाही झाली होती. तथापि, अमेरिका आणि अन्य अनेक देशांनी आमच्यावर कारवाई न करण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे आमच्या सरकारने कारवाई टाळली, असा गौप्यस्फोट चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

तो दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानवर सूड उगविला पाहिजे, ही भावना माझ्या मनात निर्माण झाली होती. तथापि, त्यावेळच्या केंद्र सरकारने अंतिमत: अशी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारताचा परराष्ट्र व्यवहार विभाग आणि ज्येष्ठ मुत्सद्दी यांच्या प्रभावाखाली घेण्यात आला होता. पाकिस्तानवर सैनिक कारवाई करु नका, अशी सूचना अमेरिकेने केली होती. अमेरिकेच्या त्यावेळच्या विदेश व्यवहार मंत्र्यांनी भारताला कारवाई न करण्याचा आग्रह केला. इतरही अनेक देशांनी भारताला कारवाईपासून रोखले. त्यामुळे कारवाईचा विचार सोडून देणे भाग पडले. वास्तविक हा हल्ला जेव्हा होत होता आणि मुंबईत दहशतवादी हिंसाचारात जळत होती, त्याचवेळी मनमोहनसिंग यांनी कारवाई करण्या मान्यता असल्याचे स्पष्ट केले होते. तथापि, कारवाई दबावामुळे प्रत्यक्षात येऊ शकली नाही, अशी स्पष्टोक्ती चिदंबरम यांनी मुलाखतीत केली आहे. त्यामुळे काँग्रेसची मोठीच कोंडी झाली आहे. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर कडाडून टीका केली असून, सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपामुळे कारवाई टाळल्याचा आरोप केला आहे. चिदंबरम यांच्या कबुलीमुळे काँग्रेसअंतर्गत वाद पेटणे शक्य आहे.

भाजपचा काँग्रेसवर घणाघात

चिदंबरम यांनी नवे असे काहीच प्रतिपादन केलेले नाही. काँग्रेसप्रणित सरकारने पाकिस्तानवर सैनिकी कारवाई का टाळली, हे प्रारंभापासूनच ज्ञात होते. काँग्रेसच्या बोटचेप्या धोरणांमुळेच भारतात दहशतवाद फोफावला होता. पाकिस्तानने भारतात रक्तपात आणि दहशतवादी हिंसाचार घडविला, तरी पाकिस्तानसमोर लोटांगण घालणे थांबवायचे नाही, हे काँग्रेसचे धोरण होते. मनमोहनसिंग सरकार त्यावेळी अमेरिकेकडून आदेश का घेत होते, हे आता काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे. चिदंबरम यांनी इतक्या वर्षांनंतर दिलेल्या या कबुलीमुळे काँग्रेसचे खरे स्वरुप उघडे पडले आहे, अशा अर्थाची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केली. या पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनीही काँग्रेसला धारेवर धरले आहे. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे.

काँग्रेसकडून कारस्थान

मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर सूड उगविण्याचे सोडाच, पण काँग्रेसने पाकिस्तानला क्लिन चिट दिली होती. इतकेच नव्हे, तर 2007 मध्ये झालेल्या समझोता एक्स्पे्रस हल्ला प्रकरणीही काँग्रेसने पाकिस्तानला निर्दोष ठरविले होते. इतकेच नव्हे, तर या हल्ल्यांची जबाबदारी हिंदू संघटनांवर टाकण्यासाठी एक व्यापक कारस्थानही रचले होते. हिंदूंनाच दहशतवादी ठरविण्याचा हा अत्यंत घातक आणि निर्दय कट होता, असाही घणाघात शहजाद पूनावाला यांनी केला आहे. त्यावेळचे काँग्रेसप्रणित सरकार कशा प्रकारे आपल्या सत्तास्वार्थासाठी पाकिस्तानचे लांगूलचालन करीत होते, हे आता स्पष्ट होत आहे. देशहिताचा बळी देण्यात आला होता, अशीही कठोर टीका भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे.

काँग्रेसची होणार चांगलीच कोंडी

ड चिदंबरम यांच्या कबुलीमुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता

ड काँग्रेसप्रणित केंद्रीय सरकारने तेव्हा दिला होता भारताच्या हिताचा बळी

ड पाकिस्तानवर कारवाई न करता हिंदूंनाच दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न

Advertisement
Tags :

.