कामावर हजर नसणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई
कोल्हापूर :
कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी शुक्रवारी सकाळी शहरात स्वच्छतेच्या अनुषंगाने पाहणी केली. यावेळी 27 सफाई कर्मचारी आणि 3 टिपर चालक कामावर गैरहजर असल्याचे दिसून आले. या सर्वांचे अर्ध्या दिवसाचे वेतन कपात करण्यात आले.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शुक्रवारी सकाळी शहरातील स्वच्छतेच्या अनुषंगाने फिरती केली. यावेळी स्वच्छतेचे काही सफाई कर्मचारी जागेवर नसलेचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी विभागीय कार्यालयातील प्रभाग क्षेत्रीय अधिकारी तथा उप-आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांना समक्ष भागात जाऊन फिरती अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे 27 सफाई कर्मचाऱ्यांचे व 3 टिप्पर चालकांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात करण्यात आले. यामध्ये राजारामपुरी विभागीय कार्यालयाअंतर्गत 5 सफाई कामगार कामावर गैरहजर होते. 3 टिप्पर दुपारच्या सत्रात भागात नसल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले. तर छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाअंतर्गत 13 सफाई कामगार व महाडीक माळ येथे 9 सफाई कर्मचारी जागेवर नसलेने त्यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात करण्यात आले. सदरची फिरती उप-आयुक्त पंडीत पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, नेहा आकोडे यांनी केली.
- अधिकाऱ्यांवरही कारवाई
महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी गुरुवारी सकाळी महापालिकेमध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्तासह 11 अधिकाऱ्यांचे अर्धा दिवसाचे पगार कापण्यात आला. यामध्ये उपायुक्त पंडीत पाटील, सहाय्यक आयुकत नेहा आकोडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, उपशहर अभियंता सुरेश पाटील, रमेश कांबळे, वर्कशॉप प्रमुख विजयकुमार दाभाडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, नगरसचिव सुनील बिद्रे, स्थानिक स्वराज्य संस्था कर अधिकारी विश्वास कांबळे, कनिष्ठ अभियंता चेतन आरमाळ यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.