मालवाहतूक करणाऱ्या खासगी आराम बसेसवर कारवाई
प्रादेशिक परिवहन विभागाकडे वाढीव तिकीट दराबाबतही तक्रारी दाखल
बेळगाव : खासगी बसमधून मर्यादेपेक्षा अधिक वजनाची मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) कडून कारवाई करण्यात येत आहे. सध्या दिवाळीनिमित्त खासगी आराम बसमधून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक केली जात आहे. परंतु त्याचबरोबर विनापरवाना मालवाहतूक केली जात असल्याने बेळगाव जिल्ह्यासह इतर विभागामध्ये कारवाई केली जात आहे. दिवाळीनिमित्ताने खासगी आराम बसचे तिकीट दर वाढविण्यात आले आहेत. एरव्ही बेळगाव-पुणे प्रवासासाठी 600 ते 800 रुपये मोजावे लागत होते. आता 800 ते 1200 रुपये मोजावे लागत आहेत. याचप्रमाणे बेंगळूर-बेळगाव, हैदराबाद-बेळगाव, मुंबई-बेळगाव या मार्गावर 1500 ते 2000 रुपये तिकीट दर द्यावा लागत आहे.
या मार्गांवर मोजक्याच परिवहन मंडळाच्या बसेस असल्याने खासगी आराम बसचालकांचे फावले आहे. वाढीव दराबद्दल काही प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. खासगी आराम बसचालक केवळ प्रवासीच नाहीतर पैशाच्या आमिषाने मालवाहतूक करीत आहेत. आराम बसच्या खालील भागामध्ये अवजड साहित्य भरले जात आहे. मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात आराम बसमध्ये इतर साहित्य भरले जात असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई सुरू केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील अनेक आराम बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. केवळ खासगी आराम बसच नाहीतर रिक्षा, ट्रक यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गोवा या परराज्यातील वाहने परमिट नसताना बेळगाव जिल्ह्यात मालवाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्याने आरटीओच्या भरारी पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे.