अनावश्यक सिझेरियन करणाऱ्या खासगी इस्पितळांवर कारवाई
आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांची माहिती
बेळगाव : राज्यातील अनेक खासगी इस्पितळांमध्ये अनावश्यकपणे सिझेरियन प्रसूती केली जात आहे. रुग्णांकडून पैसे उकळण्यासाठी सिझेरियन प्रसूती करणाऱ्या खासगी इस्पितळांवर कारवाई केली जाईल, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले. सोमवारी विधानपरिषद सदस्य गोविंद राजू यांच्या चिन्हांकित प्रश्नावर उत्तर देताना मंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले, राज्यातील कोणत्याही खासगी इस्पितळांत अनावश्यकपणे सिझेरियन प्रसूती होत असल्याचे आढळून आलेले नाही. तसेच जिल्हा केपीएमई नोंदणी आणि तक्रार निवारण प्राधिकरणाकडे अनावश्यक सिझेरियन प्रसूतीबाबत कोणत्याही तक्रारी दाखल झालेल्या नाहीत.
जर अशा प्रकरणात तक्रारी दाखल झाल्या तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केपीएमई कायद्याच्या कलम 15(1) अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तत्पूर्वी प्रश्न उपस्थित करताना विधानपरिषद सदस्य गोविंदराजू म्हणाले, राज्यातील खासगी इस्पितळांमध्ये 70 टक्के प्रसूती सी सेक्शन सिझेरियन पद्धतीने होतात. अशा प्रकारच्या प्रसूतीची प्रकरणे वाढण्यामागील कारणे कोणती? सरकारी इस्पितळांमधील डॉक्टरच गर्भवती महिला व त्यांच्या कुटुंबीयांना खासगी इस्पितळांकडे जाण्याची शिफारस करत आहेत. गर्भवती महिलांच्या कुटुंबीयांची लूट करणाऱ्या खासगी इस्पितळांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.