For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमली पदार्थ विक्रत्यांविरोधात कारवाई

06:08 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमली पदार्थ विक्रत्यांविरोधात कारवाई
Advertisement

दिल्ली पोलिसांचे अभियान, 944 जण ताब्यात

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

राजधानी दिल्लीत वाढलेला अमली पदार्थांचा सुळसुळाट रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी धडक कारवाई चालविली आहे. गेल्या शनिवारी आणि रविवारी दिल्लीतील 325 ठिकाणांवर अचानकपणे एकाचवेळी धाडी घालण्यात आल्या असून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 944 जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत 108.93 ग्रॅम हेरॉईन, 66.28 किलो गांजा, 1.1 किलो चरस आणि 16 ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले आहे. 66 जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले.

Advertisement

या कारवाईची माहिती बुधवारी देण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या 944 संशयितांमध्ये अमली पदार्थांच्या 74 साठेबाजांचा समावेश आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारच्या ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला. त्यांच्यावर अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या अंतर्गत प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. अवैध दारुची विक्री करणाऱ्या 54 जणांनाही ताब्यात घेण्यात आले अशी माहिती देण्यात आली.

‘कवच’ अभियानाअंतर्गत कारवाई

अमली पदार्थांमुळे एखादा संपूर्ण समाज उध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे त्यांचे उत्पादन आणि विक्री यांच्यावर तातडीने कारवाई करणे आवश्यक असते. यासाठी मे 2023 पासून देशभरात ‘कवच’ अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाच्या अंतर्गत आतापर्यंत सव्वा वर्षात 6 धाडसत्रे टाकण्यात आली आहेत. शेकडो कोटी रुपयांची अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून अनेक लोकांनी अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील अभियान हे सहावे आहे.

शिस्तबद्ध कारवाई

ही कारवाई अत्यंत गुप्तपणे आणि कोणालाही सुगावा लागू न देता करण्यात आली. राजधानीच्या 15 विभागांमधील पोलीस अधिकाऱ्यांना गुप्तचरांकडून प्राप्त झालेली अमली पदार्थ विक्रेत्यांची माहिती अचूकपणे देण्यात आली. या अधिकाऱ्यांना धाडसत्राचा कार्यक्रमही ठरवून देण्यात आला होता. त्यामुळे एकाच वेळी कारवाई करणे शक्य झाले. परिणामी अंमली पदार्थ विक्रेत्यांना सावरण्यास वेळ मिळाला नाही आणि ते पोलिसांच्या तावडीत सापडले, असेही स्पष्ट करण्यात आले. हे धाडसत्र शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत असे अखंड 12 तास चालले. दिल्लीतील जवळपास प्रत्येक संशयित विभागात ही कारवाई करण्यात आली, असे अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून स्पष्ट केले गेले.

वर्षारंभापासून 961 जणांना अटक

2024 या वर्षाच्या आरंभापासून आतापर्यंत कवच अभियानाअंतर्गत 961 ड्रग विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत 695 प्रकरणे नोंद करण्यात आली आहेत. 65 किलो हेरॉईन, 1.9 किलो कोकेन, 2 हजार 258 किलो गांजा आणि इतर प्रकारचे अमली पदार्थ आतापर्यंत या वर्षात जप्त करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या व्यापक कारवाईचे नेतृत्व अतिरिक्त सीपी संजय भाटिया यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.